Mumbai Mhada Lottery News : महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अर्थातच म्हाडा मुंबई मंडळाच्या लॉटरी संदर्भात एक मोठे अपडेट समोर येत आहे. खरेतर मुंबई मंडळाच्या सोडतीत सहभागी होण्यासाठी आता फक्त एक दिवस बाकी राहिला आहे. सुरुवातीला या लॉटरीला नागरिकांनी अपेक्षित प्रतिसाद दाखवला नव्हता.
पण नंतर अर्जदारांची संख्या वाढली. मुंबई मंडळाने या लॉटरी मध्ये समाविष्ट असणाऱ्या बऱ्याचशा घरांच्या किमती कमी केल्यात आणि यामुळे अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या लॉटरी मध्ये 2030 घरांचा समावेश आहे.
आता या मुंबई मंडळाच्या लॉटरीच्या अर्ज विक्री आणि स्वीकृतीच्या प्रक्रियेला अवघा एका दिवसाचा काळ बाकी असल्याने आता आपण या घरांसाठी आत्तापर्यंत किती नागरिकांनी अर्ज सादर केला आहे? याची प्रत्यक्षात संगणकीय सोडत कधी निघणार यासंदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
खरंतर गेल्या काही दिवसांपासून या लॉटरीमध्ये सहभागी होणाऱ्या अर्जदारांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. दोन दिवसांपूर्वी अर्थातच सोमवारी अवघ्या 6 तासांत सुमारे 2700 लोकांनी लॉटरीत नशीब आजमावण्यासाठी अर्ज केले आहेत.
म्हाडाच्या म्हणण्यानुसार, सोमवारी सकाळी १० वाजेपर्यंत ८७,०६३ अर्जदारांनी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली होती. त्याच वेळी, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत नोंदणी करणाऱ्यांची संख्या 89,723 वर पोहोचली आहे.
महत्त्वाचे म्हणजे यातील ६६११४ अर्जदार लोकांनी प्रत्यक्षात अनामत रक्कम सुद्धा भरली आहे. लॉटरीत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया 19 सप्टेंबरला दुपारी बंद होणार आहे. त्यामुळे इच्छुकांना लवकरात लवकर अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई मंडळाच्या 2030 घरांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व अर्जदारांच्या कागदपत्र पडताळणीचे काम 27 सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल. अर्जदारांची यादी 27 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता प्रसिद्ध केली जाईल. यादी जाहीर झाल्यानंतर 29 सप्टेंबर पर्यंत आक्षेप नोंदवता येणार आहे.
यानंतर मग 3 ऑक्टोबरला अर्जदारांची अंतिम यादी जाहीर होणार आहे. अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर 8 ऑक्टोबरला प्रत्यक्षात संगणकीय सोडत काढली जाणार आहे. नरिमन पॉइंट यशवंतराव चव्हाण सेंटर येथे सकाळी 11 वाजता ही सोडत काढली जाणार आहे.