Mumbai Metro Ticket Rate : संध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. देशात 19 एप्रिल पासून मतदानाला सुरुवात झाली असून एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर राज्यात एकूण पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. खरे तर भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारा देश. येथील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका या लोकशाहीचा उत्सव म्हणून ओळखल्या जातात.
या सार्वत्रिक निवडणुका देशाचे भवितव्य ठरवत असतात. देशाची सत्ता कोणाच्या हातात असले पाहिजे हे निवडणुकांच्या माध्यमातून ठरत असते. यामुळे आपले भवितव्य ठरवण्यासाठी प्रत्येकाने मतदानाचा आपला अधिकार बजावणे आवश्यक आहे.
मात्र यंदा पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानात मतदानाचा टक्का चांगलाच घसरला आहे. यामुळे मतदानाचे टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.
विविध सामाजिक संस्था देखील मतदारांना मतदान करण्यासाठी प्रेरित करीत आहेत. अशातच आता मुंबई मेट्रोने देखील एक मोठा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई मेट्रोने प्रवास करणाऱ्यांना मतदानाच्या दिवशी तिकीट दरात सवलत दिली जाणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, मुंबई उत्तर, मुंबई ईशान्य पूर्व, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण आणि मुंबई दक्षिण मध्य या मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रातील सहा जागांवर 20 मे 2024 ला मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
दरम्यान या दिवशी मुंबई मेट्रो मार्ग 2 अ आणि 7 च्या सर्व प्रवाशांना तिकिटावर 10 टक्के सवलत दिली जाणार आहे. महामुंबई मेट्रो प्रशासनाने मतदानाचा टक्का वाढावा यासाठी हा निर्णय घेतला आहे.
10 टक्के सवलत मुंबई मेट्रो 1 कार्ड, मोबाईल क्यूआर तिकीट, पेपर तिकीट अशा सर्व माध्यमातून देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
यामुळे मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रातील सहा लोकसभा मतदारसंघातील मतदारांना मोठा दिलासा मिळणार असून यामुळे मतदानाची टक्केवारी वाढू शकते अशी आशा व्यक्त केली जात आहे.