Mumbai Metro News : मायानगरी, स्वप्ननगरी, बॉलीवूडनगरी अशा नानाविध नावांनी ओळखले जाणारे मुंबई हे स्वप्नाचे शहर आहे. या शहरात वास्तव्य करणे हे अनेकांचे स्वप्न आहे. पण अलीकडे मुंबईकरांना विविध आव्हानांचा देखील सामना करावा लागत आहे.
यामध्ये मुख्य आव्हान आहे ते वाहतूक कोंडीचे. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वाढत्या लोकसंख्येअभावी तोकडी ठरू लागली आहे. हेच कारण आहे की शहरातील नागरिकांसाठी आता शहरात मेट्रो सुरू करण्यात आली आहे. राजधानी मुंबईमध्ये विविध मेट्रो मार्गांची कामे सूरु आहेत.
नवी मुंबईमध्ये देखील एका मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे या मेट्रो मार्गाचे काम पूर्ण देखील झाले आहे. परंतु हा मेट्रोमार्ग उद्घाटना अभावी लाल फितीत अडकला आहे. यामुळे नवी मुंबईकरांना अजून मेट्रोचा लाभ मिळू शकलेला नाही.
परिणामी नवी मुंबई शहरातील नागरिकांमध्ये शासनाविरोधात मोठी नाराजी पाहायला मिळत आहे. मात्र आता नवी मुंबईकरांची ही नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरले आहेत. कारण की नवी मुंबई शहरातील मेट्रो संदर्भात एकनाथ शिंदे यांनी नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री महोदय यांनी नवी मुंबई शहरातील मेट्रो मार्गाचे उद्घाटन न करताच त्याचा शुभारंभ करण्याचे आदेश दिले आहेत. नवी मुंबई शहरातील नागरिकांसाठी हा मेट्रोमार्ग तात्काळ सुरू करण्याचे महत्त्वाचे आदेश मुख्यमंत्री महोदय यांनी नुकतेच निर्गमित केले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी बेलापूर ते पेंधार हा नवी मुंबई मधील पहिला मेट्रो मार्ग उद्या अर्थातच 17 नोव्हेंबर 2023 रोजी कोणत्याही प्रकारचा औपचारिक उद्घाटन सोहळा न करता नवी मुंबईकरांसाठी सुरू करण्याचे महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी घेतलेला हा निर्णय निश्चितच नवी मुंबई शहरातील नागरिकांसाठी दिलासादायक राहणार आहे. यामुळे शहरातील नागरिकांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मेट्रोची आतुरता आता संपणार आहे. आता आपण या मेट्रो मार्गावरील मेट्रोचे वेळापत्रक जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं असेल नवी मुंबई मेट्रोचे वेळापत्रक
हाती आलेल्या माहितीनुसार, नवी मुंबई शहरातील या पहिल्या मेट्रो मार्गावर सकाळी 6 वाजता पहिली मेट्रो धावणार आहे. तसेच दोन्ही बाजूंकडून शेवटची मेट्रो ही रात्री 10 वाजता धावणार आहे. तसेच या मार्गावर दर 15 मिनिटांनी मेट्रो धावणार आहे.
मात्र उद्या म्हणजे मेट्रो सेवा सुरू होण्याच्या दिवशी पहिली मेट्रो दुपारी तीन वाजता धावेल आणि शेवटची मेट्रो रात्री दहा वाजता धावणार आहे. 18 तारखेपासून मात्र सकाळी सहा ते रात्री 10 पर्यंत मेट्रो सेवा सुरू राहणार आहे.
तिकीट दर काय राहणार
मेट्रो प्रशासनाकडून हाती आलेल्या माहितीनुसार या मार्गावरील मेट्रोसाठी झिरो ते दोन किलोमीटर अंतरासाठी दहा रुपये, दोन ते चार किलोमीटर अंतरासाठी पंधरा रुपये, चार ते सहा किलोमीटर अंतरासाठी वीस रुपये, सात ते आठ किलोमीटर अंतरासाठी 25 रुपये, आठ ते दहा किलोमीटर अंतरासाठी 30 रुपये आणि दहा किलोमीटरच्या पुढील अंतरासाठी 40 रुपये एवढे तिकीट दर आकारले जाणार आहेत.