Mumbai Metro News : मुंबईकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी हाती आली आहे. शहरातील एक महत्त्वाचा मेट्रोमार्ग लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. खरंतर गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई पुणे नागपूर यांसारख्या महानगरांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम व्हावी यासाठी मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे.
या तिन्ही शहरांमध्ये गेल्या काही वर्षांपासून मेट्रो सुरू असून मेट्रोमुळे शहरातील नागरिकांचा प्रवास वेगवान झाला आहे. दरम्यान मुंबई मधील आणखी एक महत्त्वाचा मेट्रो मार्ग लवकर सुरू होणार आहे. मुंबईतील पहिला भूमिगत मेट्रो मार्ग येत्या काही दिवसात प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
मेट्रो मार्ग 3 या भुयारी ३३.५ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. या मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. अजून प्राधिकरणाच्या माध्यमातून या वृत्ताला दुजोरा देण्यात आलेला नाही.
परंतु नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी या मार्गाचे उद्घाटन करू शकतात असे बोलले जात आहे. या मार्गातील आरे ते बीकेसी हा 12.5 किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा पूर्णपणे बांधून तयार झाला आहे.
एवढेच नाही तर आरे ते बीकेसी दरम्यान मेट्रो चालवण्यासाठी आवश्यक असणारे सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याची प्रक्रिया देखील अंतिम टप्प्यात आली आहे. दुसरीकडे मंगळवारी या मार्गावर मेट्रोची चाचणी देखील पूर्ण झाली आहे.
यामुळे सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्यात हा शहरातील पहिला भूमिगत मेट्रो मार्ग प्रवाशांच्या सेवेत येण्याची दाट शक्यता आहे. यामुळे आरे ते बीकेसी हा प्रवास वेगवान होणार आहे. दरम्यान आता आपण या मेट्रो मार्गाचे वेळापत्रक कसे राहणार आणि याचे तिकीट दर कसे आहेत या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कसे राहणार वेळापत्रक?
या मार्गावर सोमवार ते शनिवार सकाळी साडेसहा वाजेपासून ते रात्री साडेदहा वाजेपर्यंत मेट्रो चालवली जाणार आहे. रविवारी मात्र सकाळी साडेआठ वाजेपासून ते रात्री साडेदहा वाजेपर्यंत मेट्रो सुरू राहील.
तिकीट दर कसे आहेत?
मेट्रो मार्ग तीनच्या पहिल्या टप्प्यात एकूण दहा स्थानके आहेत. या मार्गावर मेट्रोच्या दैनंदिन 96 फेऱ्या होणार आहेत. अर्थातच प्रत्येकी साडेसहा मिनिटांनी मेट्रो उपलब्ध होणार आहे. या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून 10 ते 50 रुपये एवढे तिकीट आकारले जाणार आहे.