Mumbai Local Railway : मुंबईसह संपूर्ण देशभरातील आंबेडकरवादी जनतेसाठी आणि भीम अनुयायींसाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अर्थातच सहा डिसेंबर रोजी दादर येथील चैत्यभूमीवर सालाबादाप्रमाणे यंदाही लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी महामानव बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी गर्दी करणार आहेत.
या दिवशी महामानवाला अभिवादन करण्यासाठी, त्यांच्या समाधीच्या दर्शनासाठी संपूर्ण जगभरातून अनुयायी दाखल होत असतात. यामुळे मुंबईत मोठी गर्दी होत असते. हेच कारण आहे की, या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या माध्यमातून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईत दाखल होणाऱ्या आंबेडकरवादी जनतेला सहजतेने चैत्यभूमीला जाता यावे यासाठी विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 5 आणि 6 डिसेंबरला म्हणजेच उद्या आणि परवा या विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. या कालावधीत मध्य रेल्वे बारा विशेष लोकल गाड्या चालवणार अशी माहिती समोर आली आहे.
याबाबत मध्य रेल्वेच्या माध्यमातून एक विस्तृत परिपत्रक देखील निर्गमित करण्यात आले आहे. सदर परिपत्रकानुसार उद्या अर्थातच पाच डिसेंबर 2023 रोजी तसेच परवा अर्थातच 6 डिसेंबर 2023 रोजी मध्ये रात्री परळ-कल्याण आणि कुर्ला-पनवेलदरम्यान बारा विशेष लोकल ट्रेन चालवल्या जाणार आहेत. दरम्यान आता आपण या गाड्यांचे वेळापत्रक थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार विशेष गाड्यांचे वेळापत्रक ?
- कुर्ला-परळ विशेष लोकल रात्री पाऊण वाजता कुर्ल्याहून रवाना होणार आणि परळ येथे रात्री ०१.०५ वाजता पोहोचणार अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
- तसेच, कल्याण- परळ विशेष लोकल कल्याणहून रात्री ०१.०० वाजता रवाना होणार आणि परळ येथे सव्वा दोन वाजता पोहोचणार आहे.
- ठाणे-परळ विशेष लोकल ठाण्याहून रात्री ०२.१० वाजता रवाना होणार आहे आणि परळ येथे २.५५ वाजता पोहोचण्याची शक्यता आहे.
- परळ-ठाणे विशेष गाडी परळहून रात्री सव्वा वाजता रवाना होणार आहे, ही विशेष लोकल ठाण्याला ०१.५५ वाजता पोहोचणार आहे.
- परळ-कल्याण विशेष लोकल ट्रेन परळहून रात्री ०२.२५ वाजता रवाना होणार आणि कल्याणला ०३.४० वाजता पोहोचणार आहे.
- परळ-कुर्ला विशेष लोकल परळहून रात्री ०३.०५ वाजता रवाना होईल आणि कुर्ला येथे ०३.२० वाजता पोहोचणार आहे.
- वाशी-कुर्ला विशेष लोकल वाशीहून रात्री दिड वाजता रवाना होईल आणि कुर्ला येथे ०२.१० वाजता पोहोचणार आहे.
- पनवेल-कुर्ला विशेष लोकल गाडी पनवेलहून सकाळी ०१.४० वाजता रवाना होणार आणि कुर्ला येथे पावणे तीन वाजता पोहोचणार आहे.
- वाशी-कुर्ला विशेष लोकल वाशीहून रात्री ०३.१० वाजता रवाना होईल आणि कुर्ला येथे दुपारी ०३.४० वाजता पोहोचणार आहे.
- कुर्ला-वाशी विशेष लोकल कुर्ल्याहून रात्री अडीच वाजता रवाना होईल आणि वाशीला ०३.०० वाजता पोहोचणार आहे.
- कुर्ला-पनवेल विशेष लोकल कुर्ल्याहून रात्री ०३.०० वाजता रवाना होईल आणि पनवेलला ०४.०० वाजता पोहोचणार आहे.
- कुर्ला-वाशी विशेष लोकल कुर्ल्याहून रात्री ०४.०० वाजता रवाना होईल आणि वाशीला ०४.३५ वाजता पोहोचणार आहे.