Mumbai Local News : मुंबईमधील नागरिकांसाठी एक खुशखबर आहे. देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राचे राज्य राजधानीत प्रवासासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात लोकलचा वापर करतात. यामुळे लोकलला मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखले जाते. पण लोकल गाड्यांमध्ये होणारी गर्दी ही सर्वसामान्य प्रवाशांची चिंता वाढवते.
लोकलमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे अपघात होण्याची देखील भीती असते. अशातच मात्र पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेला नुकतीच एक सामान्य लोकल मिळाली आहे आणि पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात आणखी एक एसी लोकल दाखल होणार आहे.
तब्बल चार वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पश्चिम आणि मध्य या दोन्ही मार्गांसाठी नवीन उपनगरीय ट्रेन मिळाल्या आहेत. या दोन लोकलमुळं मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार असून मध्य रेल्वे मार्गावर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर ये-जा करणाऱ्या दैनंदिन प्रवाशांची चांगली सोय होणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वे मार्गावर नवीन एसी लोकल चालवली जाणार आहे. ही एसी लोकल गाडी मंगळवारी रात्री विरार यार्डात दाखल सुद्धा झाली आहे.
आता आठवडाभर या लोकलची टेस्टिंग केली जाणार अशी माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी दिली आहे. चाचणी पूर्ण झाल्यानंतर ही लोकल प्रवासी सेवेत दाखल होणार आहे. या नव्या लोकलमुळं पश्चिम रेल्वेच्या 10 ते 12 एसी सेवांमध्ये वाढ होणार आहे.
एसी गाडीच्या फेऱ्या वाढणार असल्याने साहजिकच या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना याचा फायदाच होणार आहे, मात्र ही गाडी नेमक्या कोणत्या मार्गावर धावणार अर्थातच जलद मार्गावर धावणार की धिम्या मार्गावर याबाबतचा अंतिम निर्णय अजून झालेला नाही.
त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या जलद मार्गावर ही नवीन एसी लोकल चालवली जाणार की धिम्या मार्गावर हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या पश्चिम रेल्वेवर लोकलच्या एकूण 1406 फेऱ्या होतात.
मात्र यात आणखी वाढ झाल्यास प्रवाशांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. पश्चिम रेल्वे सोबतच मध्य रेल्वेला देखील नवीन लोकल गाडी मिळाली आहे मात्र ही सामान्य लोकल गाडी आहे. चौथा कॉरिडॉर असलेल्या बेलापूर-उरण मार्गिकेवर सुरू असलेल्या जुन्या लोकलच्या जागेवर ही नवी सामान्य लोकल धावणार अशी खात्रीलायक माहिती हाती आली आहे.
ही लोकल 12 डब्यांची राहणार आहे. सध्या बेलापूर-उरण विभागात तीन रेट्रोफिटेड लोकल गाड्यांचा वापर केला जातो. या तीन लोकलपैकी एक गाडी बदलून त्या जागी नवी लोकल चालवली जाणार आहे.