Mumbai Local News : मुंबई लोकलला मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखले जाते. लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या शहरात आणि उपनगरात खूपच उल्लेखनीय आहे. जर तुम्हीही मुंबई लोकलने प्रवास करणारे प्रवासी असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खास राहणार आहे.
कारण की, मध्य रेल्वेने मुंबई लोकलमधील प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि कौतुकास्पद असा निर्णय घेतला आहे. हा निर्णय लोकलमधील महिला प्रवाशांसाठी विशेष फायदेशीर ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वे लोकलने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांसाठी रेल्वे स्थानकावर वुमन पावडर रूम अर्थातच सौंदर्य प्रसाधन गृह उभारणार आहे.
खरंतर, मुंबई लोकल मधील महिला प्रवाशांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून याबाबतची मागणी केली जात होती. यासाठी वारंवार रेल्वेकडे पाठपुरावा केला जात होता. दरम्यान आता हा पाठपुरावा यशस्वी झाला असून येत्या दोन महिन्यात महिला प्रवाशांसाठी मुंबईमधील सात महत्त्वाच्या स्थानकावर वूमन पावडर रूमची उभारणी केली जाणार आहे.
कोणत्या रेल्वे स्थानकावर उभारणार वूमन पावडर रूम
मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई विभागातील एकूण सात महत्त्वाच्या स्थानकावर ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यात लोकमान्य टिळक टर्मिनस (फलाट क्रमांक एकजवळ), कांजूरमार्ग (फलाट क्रमांक वन-ए), मुलुंड (पश्चिम), मानखुर्द (फलाट क्रमांक एक), चेंबूर (फलाट क्रमांक एक) घाटकोपर (फलाट क्रमांक एक) आणि ठाणे (फलाट क्रमांक दोन) या सात स्थानकांचा समावेश राहणार आहे.
दरम्यान ही सौंदर्य प्रसाधनगृहे जागतिक दर्जाची राहतील आणि यामुळे महिलांना प्रवासादरम्यान मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याचा दावा केला जात आहे. वुमन पावडर रूम सोबतच सौंदर्य साहित्यांचे विक्री दालन, कॉफीशॉप, शिशुंच्या स्तनपानासह डायपर बदलण्यासाठी स्वतंत्र जागा या सुविधा देखील या संबंधित रेल्वे स्थानकावर महिलांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
याचाच अर्थ आता लोकलमधील महिला प्रवाशांना एकाच छताखाली विविध सुविधा उपलब्ध होणार आहेत. याशिवाय, मोफत वायफाय, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही आणि शहरातील अन्य सौंदर्य प्रसाधनगृहांचा शोध घेण्यासाठी अॅप अशा सुविधा महिला प्रवाशांना उपलब्ध होणार असल्याची माहिती मध्ये रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे.
विशेष म्हणजे या कामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती झाली असून संबंधित कंत्राटदाराला याचा कार्यादेश देण्यात आला आहे. तसेच संबंधित कंत्राटदाराला हे काम येत्या दोन महिन्यात पूर्ण करण्यासाठी आदेशित करण्यात आले आहे.
त्यामुळे त्या दोन महिन्यात मुंबईमधील लोकलने प्रवास करणाऱ्या महिलांना वुमन पावडर रूमचा लाभ मिळेल असा आशावाद आता व्यक्त होऊ लागला आहे. निश्चितच मध्ये रेल्वेचा हा निर्णय महिला प्रवाशांसाठी खूपच फायदेशीर राहणार असून या निर्णयाचे महिलांनी स्वागत केले आहे.