Mumbai Kolhapur Vande Bharat Express : 2019 मध्ये वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली आणि तेव्हापासून भारतीय रेल्वेचा कायापालट झाला. रेल्वेचा प्रवास आधीच्या तुलनेत अधिक जलद आणि सुरक्षित झाला आहे. वंदे भारत एक्सप्रेसमुळे भारतीय रेल्वेला सुगीचे दिवस आले आहेत सोबतच प्रवाशांनाही या गाडीचा खूपच फायदा होत आहे.
यामुळे या गाडीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या देशातील 55 महत्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे भारतीय रेल्वे देशातील अधिकाअधिक मार्गांवर ही गाडी चालवण्यासाठी प्रयत्न करत आहे.
याच पार्श्वभूमीवर येत्या 15 सप्टेंबरला देशाला दहा नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या दहा गाड्यांमध्ये पुणे ते हुबळी दरम्यानच्या वंदे भारत एक्सप्रेस चा देखील समावेश करण्यात आलेला आहे.
पुणे-हुबळी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ला कोल्हापूरला देखील थांबा देण्यात आला आहे. खरे तर लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी कोल्हापूरला आले असता त्यांनी मुंबई ते कोल्हापूर यादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाणार अशी घोषणा केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आधी तत्कालीन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील मुंबई ते कोल्हापूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असे म्हटले होते. खासदार धनंजय महाडिक यांनी गेल्या एका वर्षभरात यासाठी मोठ्या प्रमाणात पाठपुरावा देखील केला आहे.
या पाठपुराव्याच्या जोरावर या वंदे भारत एक्सप्रेसला मंजुरी दिली गेली होती आणि याचे वेळापत्रक देखील तयार करण्यात आले होते. अशातच आता पुणे ते हुबळी दरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू केली जाणार आहे. विशेष म्हणजे या गाडीला कोल्हापूरला थांबा मंजूर करण्यात आला आहे.
म्हणजेच पुणे ते हुबळी आणि मुंबई ते कोल्हापूर अशा दोन ट्रेन सुरू करण्याऐवजी एकाच वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनवर कोल्हापूरकरांची बोळवणी करण्याचा प्लॅन रेल्वेने आखला असल्याचे दिसत आहे.
मात्र, कोल्हापूरकरांच्या माध्यमातून स्वातंत्र वंदे भारत एक्सप्रेस ची मागणी केली जात आहे. यामुळे मुंबई ते कोल्हापूर दरम्यान स्वातंत्र वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार की पुणे ते हुबळी या वंदे भारत एक्सप्रेसवरच कोल्हापूरकरांची बोळवणी होणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे.