Mumbai Goa Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची हाय स्पीड ट्रेन 2019 मध्ये सर्वप्रथम रुळावर पाहायला मिळाली. ही गाडी अवघ्या काही वर्षातच रेल्वे प्रवाशांमध्ये लोकप्रिय झाली आहे. या गाडीमुळे प्रवाशांचा प्रवास हा सुपरफास्ट होत आहे. सध्या स्थितीला वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ही देशातील 51 महत्त्वाच्या मार्गावर धावत आहे.
यातील आठ मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत हे विशेष. राज्यातील सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते साईनगर शिर्डी, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, नागपूर ते बिलासपूर आणि इंदोर ते नागपूर या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस ही ट्रेन सुरू आहे.
यातील मुंबई ते गोवा अर्थातच सीएसएमटी ते मडगाव वंदे भारत एक्सप्रेस ही प्रवाशांमध्ये खूपच लोकप्रिय बनली आहे. या गाडीचा कोकणातील रेल्वे प्रवाशांना मोठा फायदा झाला आहे. मुंबईहून कोकण तथा गोव्याला जाणाऱ्यांना या गाडीने जलद गतीने जाता येणे शक्य होत आहे.
या गाडीमुळे मुंबई ते गोवा हा प्रवास फक्त आणि फक्त आठ तासात पूर्ण होत आहे. मात्र आता या गाडीने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना आठ तासांऐवजी दहा तासांचा वेळ खर्च करावा लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 10 जून 2024 पासून कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक लागू होणार आहे.
यानुसार ही गाडी आठवड्यातून 6 दिवसांऐवजी तीन दिवस चालवली जाणार आहे आणि या गाडीचा वेग देखील कमी होणार असून यामुळे आता मुंबई ते गोवा असा प्रवास करायचा झाल्यास दहा तासांचा वेळ खर्च करावा लागणार आहे. मात्र हे वेळापत्रक अजून लागू झालेले नाही 10 जून 2024 पासून हे वेळापत्रक लागू होईल आणि 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत हे वेळापत्रक कायम राहणार आहे.
कसं आहे नियमित वेळापत्रक ?
मुंबई ते गोवा हे ५८६ किमीचे अंतर कापण्यासाठी वंदे भारत एक्स्प्रेला सध्या ७.४५ तास लागतात. गाडी क्रमांक २२२२९ / २२२३० वंदे भारत एक्स्प्रेस सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार या दिवशी धावते.
गाडी क्रमांक २२२२९ सीएसएमटी – मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस पहाटे ५.२५ वाजता मुंबईतुन सुटते आणि गोव्याला, मडगावला दुपारी १.१० वाजता पोहोचते. तसेच गाडी क्रमांक २२२३० मडगाववरून दुपारी २.४० वाजता सुटते आणि रात्री १०.२५ वाजता सीएसएमटी मुंबईला पोहोचते.
पावसाळी वेळापत्रक कसे राहणार
पावसाळी वेळापत्रकानुसार ही गाडी आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे. मुंबई-गोवा (गाडी क्रमांक २२२२९) वंदे भारत एक्स्प्रेस सोमवार, बुधवार आणि शुक्रवार हे तीन दिवस चालवली जाणार आहे. ही गाडी पहाटे ५.२५ वाजता सीएसएमटीवरून सुटणार आहे आणि मडगाव येथे दुपारी ३.३० वाजता पोहोचणार आहे.
तसेच गोवा-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस(गाडी क्रमांक २२२३०) मडगाववरून मंगळवार, गुरुवार आणि शनिवार हे तीन दिवस चालवली जाणार आहे. ही ट्रेन दुपारी १२.२० वाजता सुटणार आहे आणि रात्री १०.२५ वाजता मुंबईमधील सीएसएमटीला पोहोचणार आहे. हे वेळापत्रक 10 जून 2024 पासून लागू होणार आहे.
तसेच 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत हे वेळापत्रक कायम राहील. या पावसाळी वेळापत्रकानुसार मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसने या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास करण्यासाठी दहा तासांचा कालावधी लागणार आहे. अर्थातच सव्वा दोन तासांचा अधिकचा वेळ लागणार आहे.