Mumbai Ahmedabad Bullet Train : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात रेल्वे वाहतूक सुधारण्यासाठी शासन आणि प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. याचाच एक भाग म्हणून देशात वंदे भारत एक्सप्रेस सारखी हायस्पीड ट्रेन सुरू झाली आहे. तसेच भारतात बुलेट ट्रेन देखील लवकरच सुरु होणार आहे. भारतातील पहिली बुलेट ट्रेन ही आपल्या महाराष्ट्रातून धावणार आहे.
देशातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांना जोडणार आहे. दरम्यान याच प्रकल्पाबाबत केंद्रीय रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठी अपडेट दिली आहे.
मंत्री महोदय यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्प अंतर्गत विकसित होत असलेल्या स्थानकांच्या निर्मितीमध्ये बरीच प्रगती झाली आहे. यामुळे 2026 मध्ये या प्रकल्पाच्या एका विभागात बुलेट ट्रेन धावू शकते असे त्यांनी म्हटले आहे.
आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत केंद्रीय मंत्री म्हणाले की, अहमदाबाद-मुंबई मार्गावर बुलेट ट्रेनचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. ते म्हणालेत की, आतापर्यंत या प्रकल्पाचे ‘290 किलोमीटरहून अधिकचे काम पूर्ण झाले आहे.
या प्रकल्पांतर्गत आत्तापर्यंत 8 नद्यांवर पूल बांधण्यात आले आहेत. तसेच सध्या 12 स्थानकांवर काम सुरू आहे. विशेष म्हणजे या स्थानकांचे काम देखील अंतिम टप्प्यात आले आहे. खरे तर या प्रकल्पाचे काम 2017 मध्ये सुरू झाले होते.
मात्र हा एक गुंतागुंतीचा प्रकल्प असल्याने याचे डिझाईन पूर्ण करण्यासाठीचे दीड वर्षांचा कालावधी खर्च करावा लागला. आता मात्र या प्रकल्पाच्या कामाने खऱ्या अर्थाने गती पकडली आहे.
यामुळे हा प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होणार असा विश्वास रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांनी व्यक्त केला आहे. जर या प्रकल्पाचे काम नियोजित वेळेत पूर्ण झाले तर 2026 मध्ये बुलेट ट्रेन रुळावर जाऊ शकते.
या कॉरिडोरच्या सुरत ते बिल्लीमोरा दरम्यान पहिल्या टप्प्यात बुलेट ट्रेन धावणार असे बोलले जात आहे. यामुळे भारताला लवकरच पहिली बुलेट ट्रेन मिळणार असे चित्र तयार होत आहे.