Mukhyamantri Yojana Doot : लोकसभा निवडणुकीत राज्यातील महायुती सरकारला मोठा फटका बसला. महायुतीचे अनेक दिग्गज उमेदवार या निवडणुकीत पराभूत झालेत. दरम्यान या पराभवातून धडा घेत आता महायुती सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी सुरू केली आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन शिंदे सरकारने अनेक मोठमोठ्या योजनाची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण, अन्नपूर्णा, लाडका भाऊ अशा अनेक योजना सुरु झाल्या आहेत.
दरम्यान आता शिंदे सरकारने राज्यातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार, प्रसिध्दी अन प्रसार करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळावा यासाठी मुख्यमंत्री योजना दूत नियुक्त केले जाणार आहेत.
राज्यभरात तब्बल ५०,००० योजनादूत नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे. याचा शासन निर्णय नुकताच निर्गमित झाला आहे. या अंतर्गत राज्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
या कार्यक्रमांतर्गत नियुक्त केल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री योजना दूताला फिक्स मानधन मिळणार आहे. दरम्यान आता आपण या कार्यक्रमाचे स्वरूप नेमके कसे राहणार याबाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कसा राहणार मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम?
या कार्यक्रमांतर्गत नियुक्त होणाऱ्या तरुणांना दरमहा दहा हजार रुपये मानधन मिळणार आहे. या नियुक्त झालेल्या तरुणांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या योजनांचा प्रचार अन प्रसार करायचा आहे. या अंतर्गत राज्यातील 50,000 तरुण योजनादूत म्हणून नियुक्त केले जाणार आहेत.
प्रत्येक गावात एक म्हणजेच प्रत्येक ग्रामपंचायतीला एक आणि शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकांसाठी एक योजनादूत नियुक्त केला जाणार आहे. या योजनादूतास दहा हजार रुपये प्रति महिना एवढे मानधन मिळणार असून यामध्ये प्रवास भत्ता व इतर सर्व खर्च समाविष्ट राहणार आहे.
निवड झालेल्या योजना दुतासोबत फक्त सहा महिन्यांचा करार केला जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे हा करार वाढवला जाणार नाही. अर्थातच नियुक्त झालेला योजनादूत फक्त सहा महिन्यांसाठी कामावर ठेवला जाणार आहे.
आवश्यक पात्रता
यासाठी 18 ते 35 वर्षे वयोगटातील उमेदवार पात्र राहणार आहेत. कोणत्याही शाखेचा पदवीधर यासाठी पात्र राहील. उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे स्वतःचा स्मार्टफोन असणे आवश्यक आहे.
या अंतर्गत फक्त महाराष्ट्रातील तरुणांची योजना दूत म्हणून नियुक्ती होणार आहे. यामुळे उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.