Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची मोठी चर्चा सुरु आहे. या योजनेची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. यानंतर अवघ्या काही तासात या योजनेचा शासन निर्णय निघाला आणि याची अंमलबजावणी सुरू झाली. या योजनेसाठी एक जुलैपासून अर्ज भरण्याला सुरुवात झाली असून 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहे.
याअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत. म्हणजेच एका वर्षात 18 हजार रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. या योजनेसाठी राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला पात्र राहणार आहेत. विवाहित, विधवा , घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना या अंतर्गत लाभ मिळणार आहे.
कुटुंबातील एक अविवाहित महिला देखील यासाठी अर्ज करण्यास पात्र ठरणार आहे. अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार आहे. ज्या कुटुंबाकडे ट्रॅक्टर पकडता चार चाकी वाहन आहे अशा कुटुंबातील महिलांना मात्र याचा लाभ मिळणार नाही.
खरेतर, सुरुवातीला या योजनेसाठी अनेक अटी होत्या. आता मात्र यातील अनेक अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ मिळावा यासाठी या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. सुरुवातीला या योजनेचा लाभ 21 ते 60 वर्षे वयोगटातील महिलांना दिला जाणार होता मात्र यानंतर ही वयोमर्यादा 65 वर्षांपर्यंत वाढवण्यात आली.
सुरुवातीला या योजनेचा लाभ पाच एकर व त्यापेक्षा कमी शेत जमीन असणाऱ्या कुटुंबातील महिलांनाच दिला जाणार असे म्हटले गेले होते. मात्र नंतर सरकारने पाच एकर पेक्षा जास्त जमीन असणाऱ्यांना देखील याचा लाभ मिळणार असे स्पष्ट केले. या योजनेचा शासन निर्णय जाहीर झाला तेव्हा याचा लाभ मिळवण्यासाठी जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते.
मात्र नंतर यामध्ये बदल करण्यात आला आणि अधिवास दाखला नसणाऱ्या महिलांसाठी पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदान कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला यापैकी कोणतेही एक कागदपत्र ग्राह्य धरले जाणार आहे. तसेच योजनेसाठी अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्नाचा उत्पन्न दाखला देखील आवश्यक होता.
मात्र आता ज्या महिलेकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांना उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागणार आहे. दरम्यान, आता अनेकांच्या माध्यमातून ज्या महिलेचे बँकेत अकाऊंट नाही त्यांना याचा लाभ मिळणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. याच संदर्भात आता सरकारने मोठी माहिती दिली आहे.
बँकेत अकाउंट नसणाऱ्यांना लाभ मिळणार का?
खरे तर या योजनेचा लाभ थेट डीबीटीच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे यासाठी बँक अकाउंट असणे आवश्यक आहे. मात्र ज्या महिलांचे बँकेत अकाऊंट नाही अशा महिलांसाठी आता सरकारने नियमांमध्ये काही बदल केला आहे.
यानुसार आता भारतीय पोस्टात अकाउंट असणाऱ्या महिलांना देखील याचा लाभ मिळणार आहे. म्हणजे ज्या महिलेचे बँकेत अकाऊंट नाही मात्र पोस्टात अकाऊंट आहे अशा महिलांना याचा लाभ मिळू शकणार आहे. या योजनेचे पहिल्या दोन महिन्याचे पैसे म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे 19 ऑगस्ट पर्यंत महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत.
यंदा 19 ऑगस्टला रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनाच्या मुहूर्तावरच सरकारच्या माध्यमातून जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा केले जातील अशी बातमी समोर आली आहे.