Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची नुकत्याच काही दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आली. अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा झाली आणि त्यानंतर लगेचच या योजनेचा जीआर काढला गेला. जीआर निघाल्यानंतर एक जुलैपासून या योजनेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली.
या योजनेअंतर्गत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत महिलांना अर्ज सादर करता येणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील विवाहित, घटस्फोटीत, परित्यक्त्या, निराधार महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जाणार आहेत.
म्हणजे पात्र महिलांना एका वर्षात 18 हजार रुपयांची भेट मिळणार आहे. यासाठी 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला पात्र ठरणार आहेत. अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिला यासाठी पात्र ठरतील.
कुटुंबातील एक अविवाहित महिला देखील यासाठी अर्ज करू शकणार आहे. परराज्यात जन्म झालेल्या मात्र महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न करणाऱ्या महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे.
सुरुवातीला या योजनेसाठी अनेक जटील नियम तयार करण्यात आले होते. आता मात्र यातील अनेक नियमांमध्ये आणि कागदपत्रांमध्ये सरकारने सूट दिली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सध्या महाराष्ट्रात सर्वत्र महिलावर्ग धावपळ करत आहे.
या योजनेसाठी अर्ज करणे हेतू महिलांची मोठी धावपळ होत आहे. अशातच वर्तमान शिंदे सरकारने या योजने संदर्भात नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे.
आज 13 जुलै 2024 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाचा निर्णय झाला आहे. खरे तर आत्तापर्यंत या योजनेसाठी अर्ज करताना महिलांना लाईव्ह फोटो द्यावा लागत होता.
मात्र आता सरकारने ही अट काढून टाकली आहे. आतापर्यंत महिलांना अर्ज करताना आपला लाईव्ह फोटो द्यावा लागायचा. पण येथून पुढे तशी गरज भासणार नाही.
ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरला जाऊ शकतो. यामुळे नक्कीच राज्यातील महिलांना दिलासा मिळणार असून यामुळे या योजनेचा फॉर्म भरणे आधीच्या तुलनेत आणखी सोपे होणार आहे.