Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात भाजपा प्रणित एनडीए आघाडीला मोठा फटका बसला. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे आणि त्यांच्या मित्र पक्षांचे अनेक उमेदवार पराभूत झाले आहेत. यामध्ये काही मंत्र्यांचा समावेश होता हे विशेष. दरम्यान आता लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. आता या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
सत्ताधारी महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपावरून मंथन सुरू आहे. दुसरीकडे महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवातून धडा घेत सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी नुकत्याच काही दिवसांपूर्वी सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देखील सुरू केली आहे.
या अंतर्गत राज्यातील पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये दिले जाणार आहेत. अर्थातच एका वर्षात पात्र महिलेला 18 हजार रुपये मिळणार आहेत. यासाठी एक जुलैपासून अर्ज भरण्याला सुरुवात झाली असून 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. या योजनेसाठी 21 ते 65 वर्षे वयोगटातील विधवा, विवाहित, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिला पात्र राहणार आहेत.
ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्या कुटुंबातील महिला यासाठी पात्र ठरतील. या योजनेचा महाराष्ट्रातील महिलांना लाभ दिला जाणार आहे. तथापि ज्या महिलांचा जन्म परराज्यात झाला आहे परंतु ज्यांनी महाराष्ट्र राज्यात अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केले आहे त्या महिला देखील यासाठी पात्र ठरणार आहेत. ज्या कुटुंबाकडे ट्रॅक्टर वगळता चार चाकी वाहन आहे अशा कुटुंबातील महिला मात्र यासाठी अपात्र ठरतील.
सरकारी नोकरी करणाऱ्या कुटुंबातील महिला यासाठी अपात्र ठरणार आहेत. आजी-माजी आमदार/खासदार असणाऱ्या कुटुंबातील महिला यासाठी अपात्र राहणार आहेत. म्हणजेच या योजनेचा सर्वसामान्य गरीब कुटुंबातील महिलांना लाभ मिळणार आहे. दरम्यान या योजनेसाठी आत्तापर्यंत एक कोटी महिलांनी अर्ज सादर केले आहेत. विशेष म्हणजे ही संख्या लवकरच दीड ते दोन कोटींच्या घरात जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या योजनेसाठी 46000 कोटी रुपयांची तरतूद करून देण्यात आली आहे.
म्हणजेच पुढील एक वर्ष या योजनेसाठी निधीची तरतूद आहे. दरम्यान या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता म्हणजेच जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे 19 ऑगस्ट 2024 ला म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी पात्र महिलांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली असून या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री महोदयांनी संबंधितांना 19 ऑगस्टच्या आधीच या योजनेचे काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दुसरीकडे या योजनेच्या नियमांमध्ये पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. या योजनेत 6 महत्त्वाचे बदल झाले असून आज आपण हेच सहा बदल थोडक्यात समजून घेणार आहोत. तथापि या योजनेत जे नवीन सहा बदल झाले आहेत त्याबाबतचा शासन निर्णय अजून जारी झालेला नाही. मात्र लवकरच या संदर्भातील शासन निर्णय सरकारकडून निर्गमित केला जाणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सहा बदल कोणते?
1) यातील पहिला बदल म्हणजे जर एखाद्या महिलेचा जन्म परराज्यात झाला असेल पण तिने महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केले असेल तर अशा महिलेला तिच्या पतीच्या कागदपत्रांवर या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे.
2) ज्या महिलांचे इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत खाते असेल ते बँक अकाउंट देखील या योजनेच्या लाभासाठी ग्राह्य धरले जाणार आहे. म्हणजेच पोस्टातील बँक खाते देखील या योजनेसाठी चालणार आहे.
3) ज्या महिला आधीच केंद्र सरकारच्या एखाद्या योजनेचा लाभ घेत असतील त्या महिला देखील यासाठी पात्र राहणार असा नवीन निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र यासाठी सदर महिलांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरून घ्यावा असे सरकारने स्पष्ट केले आहे.
4) जर नव्याने लग्न झालेल्या महिलेला विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर अशा प्रकरणांमध्ये सदर महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीची शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतो.
5) प्रत्येक शनिवारी या योजनेच्या लाभार्थी महिलांच्या यादीचे वाचन करावे लागणार आहे.
6) फॉर्म भरताना जो ओटीपी येतो त्याचा कालावधी आता थोडा वाढवला जाणार आहे. ओटीपीचा कालावधी आता दहा मिनिटे करण्यात येणार आहे.