Mukhyamantri Ladki Bahin Yojana : नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची घोषणा केली. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून सरकारने लगेचच या योजनेचा जीआर देखील जारी केला. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या, निराधार महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये दिले जाणार आहेत.
अर्थातच एका वर्षात महिलांना अठरा हजाराचा लाभ मिळणार आहे. 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला यासाठी पात्र राहणार आहेत. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिला यासाठी पात्र राहतील.
दरम्यान एक जुलैपासून या योजनेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे महिला वर्गांची सध्या मोठी धावपळ पाहायला मिळत आहे. या योजनेसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी महिलावर्ग तहसील कार्यालयांमध्ये मोठी गर्दी करत आहेत.
सुरुवातीला या योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड अनिवार्य केले होते. तसेच जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, वय अधिवास दाखला यापैकी एक डॉक्युमेंटही कंपल्सरी केले होते. मात्र या कागदपत्रांच्या अटीमुळे अनेकांच्या माध्यमातून नाराजगी व्यक्त करण्यात आली.
तसेच कागदपत्र काढण्यासाठी महिलांची आर्थिक पिळवणूक होण्याची भीती देखील व्यक्त केली गेली. याच पार्श्वभूमीवर सरकारने या योजनेच्या त्रुट्या दूर केल्या आहेत. आता या योजनेसाठी वय अधिवास दाखला अन उत्पन्नाचा दाखला कंपल्सरी राहणार नाही.
ज्या लोकांकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे अशा लोकांना उत्पन्नाचा दाखला देण्याची गरज राहणार नाही. याशिवाय ज्या महिलांचे रेशन कार्ड हे पंधरा वर्षे जुने असेल अशा महिलांना वय अधिवास दाखला देखील द्यावा लागणार नाही.
दरम्यान अनेकांच्या माध्यमातून ज्या महिलांकडे रेशन कार्ड नाही आणि उत्पन्नाचा दाखलाही नाही अशा महिला पात्र असूनही या योजनेतून वंचित राहतील अशी भीती व्यक्त करण्यात आली. यामुळे अशा पात्र महिलांना लाभ देण्यासाठी सरकारने काय उपाययोजना केल्या आहेत असा सवालही उपस्थित केला जात होता.
दरम्यान याच संदर्भात राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ज्या महिलांकडे रेशन कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला नाही त्यांना याचा फायदा कसा मिळणार? याचा एक सोपा मार्ग सांगितला आहे.
फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे, आपण या योजनेतील सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या आहेत. रहिवासी दाखला आणि उत्पनाचा दाखल्यासाठी रांग लावायची आता गरज राहिलेली नाही. त्याऐवजी पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड द्यावे लागणार आहे.
तसेच, ज्यांच्याकडे रेशन कार्डही नाही त्यांनी सेल्फ सर्टीफिकेशन केल्यास त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. यावेळी फडणवीस यांनी महिलांना फॉर्म भरताना बँक अकाउंट नंबर काळजीपूर्वक भरण्याचे आवाहन केले आहे. बँक अकाउंट नंबर चुकला तर पैसे खात्यात जमा होणार नाहीत असे फडणवीसांनी स्पष्ट केले आहे.