Mukhyamantri Ladki Bahin Yojana : सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मोठी चर्चा सुरू आहे. गाव खेड्यापासून ते मंत्र्यांच्या एसी ऑफिस पर्यंत सर्वत्र या योजनेची चर्चा आहे. सरकार या योजनेवरून स्वतःची पाठ थोपटत आहे. तर दुसरीकडे विरोधक या योजनेवरून सरकारला धारेवर धरत आहेत. या योजनेसाठी पैसे कुठून आणणार असा सवाल विरोधकांकडून केला जात आहे.
दुसरीकडे मध्यंतरी या योजनेसाठी अर्थ विभागाची नकारघंटा असल्याचे वृत्त समोर आले. मात्र स्वतः अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी अर्थ विभागाने या योजनेला नकारघंटा दिली नसल्याचे स्पष्ट केले. म्हणून याची सातत्याने चर्चा होत आहे. खरे तर या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत.
राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिला यासाठी पात्र ठरणार आहेत. विशेष म्हणजे कुटुंबातील एक अविवाहित महिला देखील यासाठी अर्ज करण्यास पात्र ठरणार आहे. परंतु अर्ज करणारी महिला 21 ते 65 वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे. अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलाचं या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.
फक्त महाराष्ट्रातील महिलांना याचा लाभ मिळणार आहे. पण ज्या महिलांचा जन्म दुसऱ्या राज्यात झाला असेल अन त्यांनी महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केले असेल तर अशा महिला सुद्धा यासाठी अर्ज करू शकणार आहेत. यासाठी एक जुलैपासून अर्ज भरण्याला सुरुवात झाली असून 31 ऑगस्ट ही अर्ज भरण्याची शेवटची दिनांक आहे.
यामुळे सध्या महाराष्ट्रातील महिलावर्ग मोठ्या प्रमाणात या योजनेसाठी अर्ज करत आहे. तथापि अनेकांच्या माध्यमातून या योजनेसाठी केलेला अर्ज मंजूर झाला आहे की बाद हे कसे चेक करायचे असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अशा परिस्थितीत आज आपण याच संदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसा चेक करायचा अर्ज ?
सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी नारीशक्ती दूत हे ॲप्लिकेशन विकसित केले आहे. जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला असेल आणि तुम्हाला आता तुमचा अर्ज मंजूर झाला की रद्द हे चेक करायचे असेल तर यासाठी सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मध्ये असणारे नारीशक्ती दूत हे ॲप्लिकेशन अपडेट करायचे आहे.
https://play.google.com/store/apps/details?id=com.saaviinfinet.narishakti_yojana_doot या लिंक वर जाऊन तुम्ही हे ॲप्लिकेशन अपडेट करू शकता. एप्लीकेशन अपडेट झाल्यानंतर एप्लीकेशन पुन्हा ओपन करा. एप्लीकेशन ओपन केल्यानंतर ज्या महिलेचा अर्ज चेक करायचा आहे तो मोबाईल नंबर टाकून एप्लीकेशन मध्ये लॉग इन करा.
यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल तो ओटीपी दिलेल्या रकान्यात तुम्हाला प्रविष्ट करायचा आहे. यानंतर तुम्हाला ओटीपी व्हेरिफाय करायचा आहे. ओटीपी टाकल्यानंतर तुमची लॉगिन पूर्ण होणार आहे. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला यापूर्वी केलेले अर्ज या पर्यायावर क्लिक करायचे आहे. मग तुम्हाला Pending to submitted, Approved, In Review, Rejected, Disapproved – Can Edit and Resubmit या पैकी कोणताही एक पर्याय दिसणार आहे.
जर तुम्हाला पेंडिंग टू सबमिटेड असा पर्याय दिसत असेल तर अंतिम सबमिशन साठी असा अर्ज प्रलंबित आहे असे समजावे. जर Approved असा पर्याय दिसत असेल तर तुमचा अर्ज मंजूर झाला असे समजावे. In Review असे असेल तर सर्वेक्षण सध्या पुनरावलोकनकर्त्यांद्वारे मूल्यांकन केले जात आहे असे समजावे. Rejected असल्यास सर्वेक्षण पुनरावलोकन करून सदर अर्ज स्वीकारला गेलेला नाही.
असा अर्ज पुन्हा सबमिट केला जाऊ शकत नाही आणि आणखी कोणतीही कारवाई करता येणार नाही. Disapproved – Can Edit and Resubmit असा पर्याय दिसत असेल तर तुमचा अर्ज स्वीकारलेला नाही मात्र तुम्ही या अर्जात बदल करून पुन्हा सबमिट करू शकणार आहात. अशा तऱ्हेने तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती चेक करू शकता.