Mukhyamantri Ladki Bahin Yojana : तुम्हीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला आहे का? मग तुमच्यासाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. खरे तर आत्तापर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी एक कोटी 41 लाखाहून अधिक महिलांनी अर्ज सादर केला असल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे एक कोटी तीस लाख अर्ज मंजूर देखील झाले आहेत. यासाठी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करता येणार असल्याने ही संख्या आणखी वाढणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शिंदे सरकारकडून पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत.
म्हणजेच एका पात्र महिलेला एका वर्षात 18 हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा लाभ जुलै महिन्यापासून दिला जाणार आहे. म्हणजेच जुलै महिन्याचे पैसे देखील महिलांना मिळणार आहेत.
सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा पहिला जुलै महिन्याचा आणि दुसरा ऑगस्ट महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाच्या आधीच महिलांच्या खात्यावर जमा करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
अशातच आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पात्र महिलांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे.
एका प्रतिष्ठित वृत्तसंस्थेने सूत्राच्या हवाल्याने असा दावा केला आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी आमंत्रण देणार आहेत.
या योजनेचा हफ्ता 17 ऑगस्टला किंवा 19 ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा हप्ता पात्र महिलांच्या खात्यावर जमा केला जाऊ शकतो असाही दावा आता होत आहे.
खरंतर महाराष्ट्रात जेव्हापासून या योजनेची घोषणा झाली आहे तेव्हापासूनच ही योजना चर्चेत आहे. या योजनेचा महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत फायदा होऊ शकतो असे बोलले जात आहे.
हेच कारण आहे की रक्षाबंधनाच्या आधीच राज्यातील सरकारकडून लाडकी बहिण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहे. विशेष म्हणजे यासाठी राज्यातील शिंदे सरकार एक मोठा कार्यक्रम आयोजित करणार आहे.
या भव्य-दिव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील महिलांना याचा लाभ दिला जाणार असून हा लाभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित होण्याची शक्यता आता वर्तवली जाऊ लागली आहे.