Mukhyamantri Ladki Bahin Yojana : नुकत्याच सादर झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत. या योजनेची विधिमंडळात घोषणा झाली आणि अवघ्या काही तासातच या योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला.
शासन निर्णय जारी झाल्यानंतर या योजनेची अंमलबजावणी देखील सुरू झाली. एक जुलैपासून या योजनेसाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र सुरुवातीला या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही जाचक अटी घालून देण्यात आल्या होत्या. यामुळे या विरोधात सर्वसामान्यांमध्ये नाराजगी वाढली होती.
या जाचक अटी पूर्ण करण्यासाठी तहसील कार्यालयांमध्ये महिलांची मोठी गर्दी वाढली होती. यामुळे अप्रत्यक्षरीत्या महिलांचे आर्थिक पिळवणूक होणार असे दिसत होते. तहसील कार्यालयांमध्ये एजंटचा सुळसुळाट वाढणार अशी भीती व्यक्त केली जात होती.
यामुळे अधिकाधिक महिलांना जर याचा लाभ द्यायचा असेल तर या जाचक अटी रद्द करणे आवश्यक होते. याच पार्श्वभूमीवर काल वर्तमान शिंदे सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जाचक अटी बऱ्यापैकी शिथिल केल्या आहेत.
कोण-कोणत्या अटी शिथिल झाल्या आहेत ?
1) ज्या महिलांकडे वय अधिवास प्रमाणपत्र नाही अशा महिलांना 15 वर्षांपूर्वीचं रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला यापैकी कोणतेही एक कागदपत्र सादर करता येणार आहे.
2) ज्या महिलांकडे पाच एकर जमीन आहे त्यांना देखील आता याचा लाभ मिळणार आहे. म्हणजे पाच एकर जमिनीची अट आता शिथिल करण्यात आली आहे.
3) या योजनेची घोषणा झाली तेव्हा 21 ते 60 वयोगटातील महिलांना लाभ मिळणार असे म्हटले गेले होते. मात्र आता ही वयोमर्यादा 65 वर्षांपर्यंत करण्यात आली आहे.
4) परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.
5) याचा लाभ अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना मिळणार आहे. यामुळे उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे. परंतु ज्यांचे पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला देखील द्यावा लागणार नाही.
7) या योजनेचा पात्र कुटुंबातील अविवाहित मुलीला देखील लाभ मिळू शकतो. म्हणजे जर कुटुंबात विवाहित महिला नसेल तर अशावेळी कुटुंबातील अविवाहित महिलेला देखील लाभ दिला जाऊ शकतो.
अर्ज करण्यास मुदत वाढ ?
आधी 15 जुलैपर्यंत या योजनेसाठी अर्ज करता येणार होता. परंतु आता या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे. परंतु या योजनेअंतर्गत एक जुलै 2024 पासूनच लाभ दिला जाणार आहे.