Mukhyamantri Ladki Bahin Yojana : सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा सुरू आहे. सरकार या योजनेवरून स्वतःला शाबासकी देण्यात व्यस्त आहे. तर विरोधकांच्या माध्यमातून ही योजना आगामी विधानसभा निवडणूका डोळ्यापुढे ठेवून सुरू करण्यात आली असून विधानसभा निवडणुका झाल्यात की, ही योजना बंद होईल असा दावा केला जात आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, ही योजना अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली. यासाठी एक जुलैपासून अर्ज केले जात आहेत.
अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना या अंतर्गत प्रत्येक महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत. अर्थातच एका वर्षात 18 हजार रुपयांचा लाभ महिलांना मिळणार आहे. महाराष्ट्रातील महिलाचं फक्त यासाठी पात्र राहणार आहेत.
वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलाही पात्र ठरतील. ट्रॅक्टर वगळता चार चाकी वाहन नसणाऱ्या कुटुंबातील महिला यासाठी पात्र ठरणार आहेत. कुटुंबातील एक अविवाहित महिला देखील यासाठी अर्ज करण्यास पात्र राहील. परराज्यात जन्मलेल्या मात्र महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केलेल्या महिला यासाठी पात्र राहतील. 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना याचा लाभ मिळणार आहे.
या योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्यात रोख लाभ मिळणार आहे, पण ही योजना जुलै महिन्यापासून लागू करण्यात आली असल्याने जुलै महिन्याचा हफ्ता देखील दिला जाणार आहे. एकंदरीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना आता दरमहा 1500 रुपयांचा पगार मिळणार आहे.
यामुळे ही योजना सध्या महाराष्ट्रात सुपरहिट होत आहे. आतापर्यंत जी महायुती लोकसभा निवडणुकीच्या पराभवामुळे बॅक फुटवर होती ती महायुती सरकार या योजनेमुळे अचानक फ्रंट फुटवर येऊन जोरदार बॅटिंग करत असल्याचे चित्र आहे.
या योजनेमुळे महायुती सरकारला फायदा होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. खरेतर, ही योजना मध्यप्रदेश राज्याच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे. मध्य प्रदेश राज्यात लाडली बहना या योजनेअंतर्गत महिन्याला फक्त बाराशे रुपये दिले जात आहेत.
महाराष्ट्र सरकार मात्र या योजनेअंतर्गत महिन्याला पंधराशे रुपये देणार आहे. दरम्यान आता या योजनेबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी मोठे विधान केले आहे. बारामती येथे जनसन्मान महामेळावा आयोजित झाला होता. या मेळाव्यात पवार बोलत होते.
यावेळी उपमुख्यमंत्री महोदयांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून राज्यातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत. या अंतर्गत रक्षाबंधनाच्या काळात महिला भगिनीच्या बँक खात्यावर दोन महिन्यांचे तीन हजार रुपये देण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस-पवार सरकारने घेतला आहे.
पण जर यात सातत्य टिकवायचे असेल तर विधानसभेतही महायुतीलाचं निवडून द्या, तरच पुढे ही योजना चालेल, असे विधान अजित पवार यांनी केले आहे. एकंदरीत अजित पवार यांनी आत्तापासूनच विधानसभेसाठी तयारी सुरू केली आहे.
दरम्यान अजितदादा यांच्या या विधानाची सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा सुरू आहे. पण, येत्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खरंच तारणार का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.