Mukhyamantri Ladki Bahin Yojana : सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मोठी चर्चा सुरू आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत. म्हणजेच एका वर्षात एका पात्र महिलेला 18 हजार रुपयांचा लाभ सरकारकडून मिळणार आहे. यामुळे सध्या या योजनेची महिला वर्गात मोठी चर्चा असून यामुळे महायुती सरकारला आगामी विधानसभा निवडणुकीत फायदा मिळू शकतो असा दावा काही राजकीय विश्लेषकांनी केला आहे.
महिला मतदारांना खुश करण्यासाठी सरकारने ऐन निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण योजना सुरु केली असल्याचे बोलले जात आहे. या योजनेवरून विरोधकांकडून सरकारवर हल्लाबोल केला जात आहे.
योजनेसाठी सरकारने कर्ज घेतले असल्याचा आरोप विरोधकांनी केला असून ही योजना फक्त निवडणुकीपुरतीच सुरू राहणार असे देखील विरोधकांकडून बोलले जात आहे. दरम्यान, आता राज्य शासनाच्या याच महत्वकांक्षी योजने संदर्भात राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाचं वक्तव्य केल आहे.
लाडकी बहिण योजनेबाबत काय म्हटलेत उपमुख्यमंत्री?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, देशातील काही राज्यातील योजना या महिलांसाठी उपयुक्त ठरत आहेत. यामुळे या योजनांचा लाभ महाराष्ट्रातील महिलांना मिळावा यासाठी त्या आम्ही स्वीकारल्या आहेत. त्या-त्या वेळेची परिस्थिती बघून आम्ही निर्णय घेत असतो. आम्ही गरिबांसाठी योजना आणत असतो. समाजाच्या हितासाठी योजना आणल्या जात आहेत.
आता आम्ही योजना आणल्या, त्याला विरोधक कसे चांगले म्हणणार ? पण, आम्ही जनतेसाठी या योजना आणल्या आहेत. त्या पुढे चालू ठेवायचा असतील, तर जनतेने आम्हाला सपोर्ट करावा तरच त्या योजना पुढच्या काळात सुरू राहतील, असं महत्त्वाचं विधान केलं आहे. यामुळे सध्या अजित पवार यांच्या या विधानाची संपूर्ण राज्यभर चर्चा पाहायला मिळत आहे.
लाडकी बहीण योजनेचा लाभ कोणाला मिळणार?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना दिला जाणार आहे. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार आहे.
कुटुंबातील एक अविवाहित महिला देखील यासाठी अर्ज करण्यास पात्र ठरणार हे विशेष. ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजना किंवा इतर योजनांअंतर्गत पंधराशे रुपयांपर्यंतचा लाभ मिळत नाहीये त्यांना याचा फायदा होणार आहे.
ज्या कुटुंबाकडे ट्रॅक्टर वगळता चार चाकी वाहन असेल अशा कुटुंबातील महिला मात्र यासाठी अपात्र ठरणार आहेत. ही योजना फक्त महाराष्ट्रातील महिलांसाठी राहणार आहे. परंतु ज्या महिलेचा जन्म राज्याबाहेर झाला असेल आणि ज्यांनी महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केले असेल अशा महिला देखील यासाठी पात्र ठरणार आहेत.
या योजनेचा लाभ हा जुलै महिन्यापासून मिळणार आहे. एक जुलैपासून यासाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहे. या योजनेचा पहिला हप्ता हा 15 ऑगस्ट ला मिळणार आहे.
या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या महिलांना जुलै महिन्यापासूनचे पैसे मिळणार आहेत. रक्षाबंधनाच्या आधी जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये राज्यातील सर्व पात्र महिलांच्या खात्यावर जमा करण्याचा मानस सरकारचा आहे.