Mukhyamantri Ladki Bahin Yojana : सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मोठी चर्चा आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर महिलांच्या खात्यावर जमा झाले आहेत. यामुळे महिला वर्गात आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान या योजनेचे पुढच्या दोन हप्त्यांचे पैसे कधीपर्यंत महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतात या संदर्भातही एक मोठी अपडेट समोर आली आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाने सुरू केलेली ही योजना मध्यप्रदेश राज्याच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ मिळणार आहे. अर्थातच वार्षिक 18 हजार रुपये दिले जाणार आहेत.
यासाठी राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला पात्र राहणार आहेत. विधवा, विवाहित, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना याचा लाभ मिळणार आहे. कुटुंबातील एका अविवाहित महिलेला देखील यासाठी अर्ज करता येणार आहे.
अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिला यासाठी पात्र ठरणार आहेत. या योजनेला नागरिकांकडून चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. एक जुलैपासून यासाठी अर्ज सादर केले जात आहेत.
आधी 31 ऑगस्ट ही या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत असल्याचे बोलले जात होते. पण आता ही मुदत सप्टेंबर पर्यंत वाढवली गेली आहे. यामुळे अधिकाधिक महिलांना याचा लाभ घेता येईल अशी आशा आहे.
लाडकी बहीण योजना अंतर्गत जुलै महिन्यापासून लाभ दिला जाणार आहे. यानुसार या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे पैसे रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.
याचा लाभ राज्यातील एक कोटीहून अधिक महिलांना झाला आहे. सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अर्थातच 14 ऑगस्ट च्या सायंकाळी काही महिलांच्या अकाउंटवर या योजनेचे पैसे जमा झाले.
यानंतर 15 ऑगस्ट च्या सकाळी लाखो महिलांना याचा लाभ मिळाला. तसेच उर्वरित महिलांना 19 ऑगस्ट पर्यंत पैसे वितरित करण्यात आलेत. दरम्यान, आता या योजनेच्या लाभार्थ्यांच्या माध्यमातून पुढील हप्ता कधी जमा होणार? या संदर्भात प्रश्न उपस्थित केला जातोय.
अशातच महिला व बालविकास विभाग अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या यवतमाळ येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी माहिती दिली आहे. मुख्यमंत्री महोदय यांनी सांगितल्याप्रमाणे, आमचे सरकार देणारे आहे, हे घेणारे नाही.
काही लोक लाडक्या बहिणीच्या खात्यातून पैसे काढून घेतील असे म्हणतं आहेत. पण, मी शब्द देतो की, दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये ऑगस्टमध्ये आले, आता आणखी पुढच्या दोन हप्त्यांचे पैसे सप्टेंबर महिन्यात जमा होतील. एकंदरीत पुढील महिन्यात या योजनेच्या दोन हप्त्यांचा लाभ दिला जाईल असे मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केले आहे.