Mukhyamantri Ladki Bahin Yojana : सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची मोठी चर्चा सुरू आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत. म्हणजेच एका पात्र महिलेला दरवर्षी 18 हजार रुपयांची भेट सरकारकडून मिळणार आहे. विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परीत्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र राहणार आहेत. या योजनेसाठी 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला पात्र राहणार आहेत.
वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ दिला जाणार आहे. याचा लाभ फक्त राज्यातील महिलांना मिळणार आहे. तथापि, ज्या महिलांचा जन्म परराज्यात झाला आहे आणि ज्यांनी महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केले आहे अशा महिला सुद्धा यासाठी पात्र राहणार आहेत. या योजनेसाठी एक जुलैपासून अर्ज भरले जात आहेत. 31 ऑगस्टपर्यंत महिलांना अर्ज करण्यास मुदत देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे या योजनेचा लाभ हा पात्र ठरणाऱ्या महिलांना रक्षाबंधनाच्या दिवशी दिला जाणार आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी अर्थातच 19 ऑगस्टला या योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे पात्र ठरणाऱ्या महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. यामुळे लाडक्या बहिण योजनेचे अर्ज भरण्यासाठी महिला वर्गांची मोठी धावपळ पाहायला मिळत आहे. मात्र शासनाकडून या योजनेच्या नियमांमध्ये सातत्याने बदल केले जात आहेत.
त्यामुळे या योजनेसंदर्भात महिला वर्गात मोठी संभ्रमावस्था पाहायला मिळत आहे. खरंतर या योजनेसाठी दररोज 70 ते 80 हजार महिला अर्ज करत आहेत. आतापर्यंत एक कोटीहून अधिक महिलांनी यासाठी अर्ज केले आहेत. अर्ज करण्यासाठी सेतू केंद्राबाहेर आणि अंगणवाडी सेविकांकडे महिलांची मोठी गर्दी होत आहे. तर काही महिला घरबसल्या ऑनलाईन अर्ज करत आहेत.
दुसरीकडे शासनाने अर्ज करण्यासाठी महिलांचे आधार कार्ड अपडेट असणे आणि बँकेला लिंक असणे आवश्यक केले असल्याने आधार केंद्र बाहेर आणि बँकांबाहेर देखील महिलांची मोठी गर्दी होत आहे. अशा या परिस्थितीतच आता एक नवीन माहिती समोर आली आहे. यामुळे या योजनेसाठी अर्ज केलेल्या लाखो महिला अर्जदारांमध्ये अस्वस्थता पाहायला मिळत आहे.
खरे तर, महिलांनी तासनतास रांगेत उभे राहून या योजनेसाठी अर्ज केले आहेत. तसेच ऑनलाईन अर्ज करणाऱ्या महिलांना सर्व डाऊनचा देखील मोठा फटका बसला आहे. म्हणजे ऑफलाईन अर्ज करतानाही आणि ऑनलाईन अर्ज करतानाही महिलांना मोठी मेहनत करावी लागली आहे. दरम्यान आता ज्या महिलांनी अर्ज सादर केले आहेत त्या अर्जांची पडताळणी सुरू झाली आहे.
शासनाने या योजनेसाठी सादर केलेल्या अर्जाची छानणी सुरु केली असून ज्या महिलांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत ते सर्व अर्ज इंग्रजी भाषेतून भरलेत की नाही याची तपासणी केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या महिलांनी शासनाच्या या योजनेसाठी मराठीतून अर्ज भरले आहेत ते अर्ज रद्द ठरवले जाणार आहेत. यामुळे सध्या महिला वर्गात मोठी खळबळ माजली आहे. आपण भरलेला अर्ज रद्द होणार अशी भीती आता महिलांना सतावत आहे.
खरेतर, या योजनेसाठी सादर केलेल्या अर्जांची छानणी करण्याचे काम शासनाने ज्या एजन्सीकडे दिले आहे त्या एजन्सीच्या सॉप्टवेअरला फक्त इंग्रजी भाषेची कमांड आहे, मराठी भाषाच त्यांच्याकडे नाही त्यामुळे सदर योजनेचे ऑनलाइन अर्ज हे इंग्रजीतुनच भरले जावे जे अर्ज मराठी भाषेतून भरण्यात आले आहेत ते अर्ज रद्द ठरवले जातील, अशी माहिती समोर येत आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या योजनेसाठी अनेकांनी मराठीतून अर्ज केले आहेत.
विशेष म्हणजे या योजनेच्या एप्लीकेशनवर देखील मराठी भाषेचा ऑप्शन देण्यात आला आहे. यामुळे अनेकांनी अर्ज मराठीतूनच दाखल केले आहेत. दरम्यान आता मराठीत सादर झालेले अर्ज बाद होणार अशी माहिती समोर येत असल्याने महिलांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत आहे. तासनतास रांगेत उभे राहून, घरातील सर्व कामे सोडून महिलांनी अर्ज केले आहेत आणि आता हे अर्ज फक्त मराठीत भरले असल्याने रद्द होणार अशी माहिती समोर आल्याने महिला वर्गात तीव्र असंतोषाची भावना आहे.
जर अर्ज इंग्रजीमध्येचं स्वीकारायचे होते मग मराठी भाषेचा ऑप्शन एप्लीकेशन मध्ये का दिला असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. याशिवाय आतापर्यंत ज्या महिलांनी मराठीतून अर्ज केला आहे त्या महिलांच्या अर्जाचे काय होणार, मराठीतून अर्ज केलेल्या महिलांचा अर्ज बाद होणार का ? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.