Mukhyamantri Ladki Bahin Yojana : सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मोठी चर्चा सुरू आहे. या योजनेची महाराष्ट्र राज्याच्या 2024-25 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घोषणा झाली. घोषणा झाल्यानंतर अवघ्या काही तासात या योजनेचा शासन निर्णय निघाला आणि योजनेसाठी अर्ज मागवलेत. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जाणार आहेत.
म्हणजेच एका वर्षात 18 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी एक जुलैपासून अर्ज मागवले जात असून 31 ऑगस्ट ही अर्ज करण्याची शेवटची तारीख राहणार आहे. या मुदतीत अर्ज करणाऱ्या महिलांना एक जुलैपासून या योजनेचे पैसे दिले जाणार आहेत.
या योजनेसाठी राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिला पात्र ठरणार आहेत. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्या कुटुंबातील महिलांसाठी पात्र ठरणार आहेत.
या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांना मिळणार आहे. मात्र ज्या महिलेचा जन्म दुसऱ्या राज्यात झाला असेल परंतु तिने महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केले असेल तर अशी महिला देखील या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरणार आहे.
या योजनेचा लाभ ट्रॅक्टर वगळता चार चाकी वाहन असणाऱ्या कुटुंबातील महिलांना मिळणार नाही. 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला या योजनेच्या लाभासाठी पात्र राहतील. दरम्यान आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे.
या योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यावर कधी जमा होणार याची मुख्यमंत्र्यांनी थेट तारीखचं सांगितली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे सोबतच दिले जाणार आहेत.
हे पैसे रक्षाबंधनाच्या दिवशी पात्र महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत. यंदा 19 ऑगस्टला रक्षाबंधन आहे आणि याच दिवशी दीड कोटी महिलांच्या खात्यात 3 हजार रुपये जमा केले जाणार आहेत.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पहिल्या दोन महिन्यांचे पैसे रक्षाबंधनच्या दिवशी महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची खात्रीलायक बातमी एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.
यामुळे रक्षाबंधनच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील लाखो बहिणींना रक्षाबंधनाचे गिफ्ट देणार असे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व कॅबिनेट मंत्र्यांना आणि पालकमंत्र्यांना या योजनेचे काम 19 ऑगस्ट पूर्वीच पूर्ण करण्याचे टार्गेट दिले आहे.
ही महायुती सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असून याचा लाभ तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचला पाहिजे, तसंच विरोधकांचा नरेटिव्ह खोडून काढा अशा सूचना अन आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत त्यांनी कॅबिनेट मंत्र्यांना आणि पालकमंत्र्यांना हे आदेश दिले आहेत.