Mukhyamantri Annapurna Yojana : ऑक्टोबर मध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यामुळे सध्या महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चासत्र सुरू आहे. जागा वाटपावरून आतापासूनच मंथन सुरू झाले आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात चांगले यश मिळाले आहे.
त्यामुळे लोकसभेसारखाच परफॉर्मन्स आगामी विधानसभा निवडणुकीतही कायम राखण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. दुसरीकडे महायुतीने लोकसभा निवडणुकीतून धडा घेत विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळवण्यासाठी तयारी सुरू केली आहे.
याच पार्श्वभूमीवर महायुती सरकारने आता राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. यासाठी नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसारख्या अनेक मोठमोठ्या योजनांची घोषणा करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे या साऱ्या योजनांची आता अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर कधीचं सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार असून यासाठी एक जुलैपासून अर्ज स्वीकारले जात आहेत.
31 ऑगस्ट ही या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक आहे. दुसरीकडे आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना देखील सुरू झाली आहे. काल अर्थातच 30 जुलै 2024 ला या योजनेचा शासन निर्णय सरकारने जारी केला आहे.
या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. यासाठी उज्वला योजनेच्या लाभार्थी तसेच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला पात्र राहणार आहेत. या योजनेच्या लाभार्थ्यांच्या कुटुंबांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत.
यामुळे लाडकी बहीण योजनेप्रमाणेच याही योजनेची महाराष्ट्रात मोठी चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीत आज आपण या योजनेच्या अटी आणि शर्ती नेमक्या काय आहेत याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
योजनेच्या अटी अन शर्ती काय आहेत ?
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांना मिळणार आहे. तसेच फक्त गॅस जोडणी असणाऱ्या महिलाचं यासाठी पात्र ठरणार आहेत.
या योजनेसाठी एका कुटुंबातील केवळ एकच लाभार्थी पात्र राहणार आहे. म्हणजे या योजनेचा लाभ एका कुटुंबातील एकाच महिलेला मिळणार आहे.
पीएम उज्वला योजना आणि लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
या योजनेतून एका महिन्यात फक्त एकच गॅस सिलेंडर मोफत मिळू शकणार आहे.
या योजनेअंतर्गत फक्त घरगुती गॅस सिलेंडरची (14.2 किलोग्रॅम) जोडणी असणाऱ्या महिला गॅस ग्राहकांना लाभ मिळणार आहे.