Monsoon Prediction 2023 : जून महिना सुरू होण्यास आता मात्र अकरा दिवसांचा कालावधी शेष राहिला आहे. साहजिकच, आता चाहूल लागली आहे ती पावसाळ्याची, मान्सून आगमनाची. तूर्तास मात्र राज्यातील बहुतांशी भागात तापमान वाढ पाहायला मिळत आहे.
तापमान राज्यात जवळपास 45 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचले आहे. यामुळे नागरिक उकाड्याने हैराण आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी बांधव आणि सामान्य जनता चातकाप्रमाणे मान्सूनची वाट पाहत आहेत.
दरम्यान भारतीय हवामान विभागाने यावर्षी वेळेतच मान्सूनचे आगमन होणार असल्याचे नुकतेच स्पष्ट केले आहे. 8 जूनच्या सुमारास राज्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सूनच आगमन सर्वप्रथम तळकोकणात होईल, त्यानंतर मुंबईमध्ये आणि मग संपूर्ण राज्यभर मान्सून आपले पाय पसरवणार आहे.
दरम्यान 21 किंवा 22 मे रोजी मान्सून अंदमान निकोबार मध्ये पोहोचणार आहे. अशातच आज आपण पंचांगानुसार कोणत्या नक्षत्रात किती पाऊस पडेल, कोणत्या नक्षत्रात कमी आणि कोणत्या नक्षत्रात जास्त पाऊस पडेल या संदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मृग नक्षत्र :- आठ जूनला मृग नक्षत्र सुरू होणार आहे. या नक्षत्रात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या नक्षत्रात 10, 16, 14 आणि 19 जून रोजी वादळी पावसाची शक्यता देखील राहणार आहे.
आर्द्रा नक्षत्र :- आर्द्रा नक्षत्र 22 जूनला सुरू होणार असून या नक्षत्रात सगळीकडे चांगल्या पावसाची शक्यता आहे. या नक्षत्रात 25 जून आणि 28 जूनला पाऊस पडणार आहे तसेच 1 जुलै ते 3 जुलै दरम्यान देखील पावसाची शक्यता राहणार आहे. विशेष म्हणजे काही भागात पुरसदृश्य परिस्थिती तयार होणार आहे.
पुनर्वसू नक्षत्र :- या नक्षत्रात सूर्य सहा जुलैला प्रवेश करणार असून या नक्षत्रामध्ये कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडेल. 7, 9, 13, 16, 19 जुलै रोजी या नक्षत्रामध्ये पावसाची शक्यता आहे.
पुष्य नक्षत्र :- या नक्षत्राची सुरुवात 20 जुलैला होणार असून या नक्षत्र काळामध्ये 20, 23, 27, 29 जुलै आणि एक ऑगस्ट रोजी पावसाची शक्यता आहे. या नक्षत्रात म्हणावा तसा पाऊस पडणार नाही.
आश्लेषा :- या नक्षत्राची सुरुवात तीन ऑगस्टला होणार असून यामध्ये समाधानकारक पाऊस पडणार आहे. काही भागात कमी पावसाची शक्यता आहे. 5, 8, 11 आणि 15 ऑगस्ट रोजी या नक्षत्रात पावसाची शक्यता तयार होत आहे.
मघा :- 17 ऑगस्टला या नक्षत्राची सुरुवात होईल आणि यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. 18, 20, 26, 28, 30 ऑगस्ट रोजी या नक्षत्रात पाऊस पडणार आहे.
पूर्वा :- या नक्षत्रात महाराष्ट्रात सर्वीकडे चांगला पाऊस पडणार आहे काही भागात पूर येईल असा पाऊस राहील. एक सप्टेंबर ते 10 सप्टेंबर पर्यंत या नक्षत्रात पावसाची शक्यता राहणार आहे. या व्यतिरिक्त 12 सप्टेंबरला देखील पाऊस पडणार आहे.
उत्तरा नक्षत्र :- 13 सप्टेंबरला या नक्षत्राची सुरुवात होणार असून या नक्षत्रात राज्यातील काही भागात चांगल्या पावसाची शक्यता आहे. 14, 15, 18, 20, 23, 25 आणि 26 सप्टेंबरला या नक्षत्रात पावसाची शक्यता आहे.
हस्त नक्षत्र :- काही भागात चांगला पाऊस होईल तर काही भागात पाऊस होणार नाही. विशेषतः विदर्भात या नक्षत्रात कमी पावसाची शक्यता राहणार आहे. 28 सप्टेंबर आणि 2, 7, 9 ऑक्टोबर रोजी या नक्षत्रात पावसाची शक्यता आहे.
चित्रा :- नक्षत्रात वादळी पावसाची शक्यता राहणार आहे. जोरदार वारे आणि पाऊस या नक्षत्रात पाहायला मिळणार आहे. 12, 13, 15, 18 आणि 22 तारखेला या नक्षत्रात पाऊस पडणार असून संपूर्ण नक्षत्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे.
स्वाती नक्षत्र :- या नक्षत्रात मध्यम पाऊस पडणार असून 25, 28, 30 ऑक्टोबर रोजी पावसाची शक्यता आहे. यानंतर 2 आणि 4 नोव्हेंबर रोजी देखील या नक्षत्रामध्ये पाऊस पडणार आहे.