Monsoon News : ऑगस्ट महिना संपत आला आहे. अर्थातच मान्सूनचे तीन महिने पूर्ण झाले आहेत. जून ते सप्टेंबर हा चार महिन्यांचा काळ मान्सूनचा असतो. या काळात राज्यात सर्व दूर पावसाची हजेरी लागते. यंदाही राज्यात या तीन महिन्यांच्या काळात चांगला पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी मान्सून काळात खूपच कमी पाऊस झाला होता.
त्यामुळे राज्यातील बहुतांशी भागांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती तयार झाली होती. यंदा मात्र जून, जुलै आणि ऑगस्ट या तीनही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात चांगला समाधानकारक पाऊस झाला आहे. जून मध्ये राज्याच्या काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी होते.
मात्र जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांमध्ये राज्यातील बहुतांशी भागात जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे भारतीय हवामान खात्याने सप्टेंबर महिन्यातही चांगल्या पावसाचा अंदाज दिला आहे.
एवढेच नाही तर हवामान खात्याने यंदा मान्सूनचा मुक्काम लांबणार असल्याचे जाहीर केले आहे. यंदा हवामान खात्याने ऑक्टोबर मध्ये ही जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास हा यंदा सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस सुरू होणार आहे.
‘ला निना’ मुळे तयार होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने सप्टेंबर च्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. खरे तर सप्टेंबर मध्ये मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होत असतो.
ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत संपूर्ण देशातून मान्सून माघारी फिरत असतो. यंदा मात्र मान्सूनचा परतीचा प्रवास उशिराने सुरू होणार आहे. सप्टेंबर अखेरीस हा प्रवास सुरू होईल आणि यामुळे मान्सून परतण्यास देखील उशीर होणार आहे.
ला निनामुळे भारतात सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडणार असा दावा हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे यापूर्वीही ला-निनामुळे मान्सून परतण्यास उशीर झाला असल्याचा दाखला अधिकाऱ्यांनी दिला आहे.
यामुळे सोयाबीन मका भात कापूस यांसारख्या खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण की, या कालावधीत खरीप हंगामातील ही सर्व पिके हार्वेस्टिंगच्या टप्प्यात असतात.
अशा परिस्थितीतच जर जोरदार पाऊस झाला तर नक्कीच या पिकांचे नुकसान होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार अशी भीती व्यक्त होत आहे.