Monsoon News : मान्सूनच्या परतीच्या प्रवासाबाबत एक मोठे अपडेट समोर येत आहे. तब्बल एका आठवडा एकाच जाग्यावर खिळून बसलेला मान्सून आज पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालाय. यावर्षी मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला एक आठवडा उशीर झाला. पण, मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर सुरुवातीला त्याने देशातील अनेक भागांमधून काढता पाय घेतला.
23 आणि 24 सप्टेंबरला देशातील काही भागांमधून मान्सून परतला मात्र तदनंतर मान्सून एकाच ठिकाणी खिळून बसला. मात्र आता एका आठवड्यानंतर त्याने पुन्हा एकदा परतीचा प्रवास सुरु केलाय.
आज जम्मू आणि काश्मिर, लडाख-गिलगिट-बाल्टीस्तान-मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाना-चंदीगड-दिल्लीच्या जवळपास सर्वच भागांमधून मान्सून परतला आहे.
एवढेच नाही तर आज उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थानच्या आणखी काही भागातून माॅन्सून माघारी फिरला असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. येत्या काही दिवसात देशातील आणखी काही भागांमधून मान्सून माघारी फिरणार आहे.
याचा परिणाम महाराष्ट्रातही पाहायला मिळत आहे. राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याने आज आणि उद्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.
आज आणि उद्या कोणत्या भागांमध्ये पावसाची हजेरी लागणार?
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज कोकणातील दक्षिणेकडील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्र विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाडा विभागातील धाराशिव, लातूल, बीड या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर या संबंधित जिल्ह्यांसाठी हवामान खात्याकडून आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोबतच आज रायगड, नगर, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो असा अंदाज आयएमडीने दिला आहे.
उद्या अर्थातच 3 ऑक्टोबरला महाराष्ट्रातील बहुतांशी भागात पावसाची उघडीप राहणार आहे. शुक्रवारी देखील राज्यात पावसाची शक्यता फारच नगण्य असल्याचे आयएमडीने स्पष्ट केले आहे.
शनिवारी आणि रविवारी मात्र पूर्व विदर्भात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होईल आणि या भागातील जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते असे IMD ने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये म्हटले आहे.
हे दोन दिवस पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदीया आणि गडचिरोली या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच हे 2 दिवस मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडा विभागात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.