Monsoon 2024 : गेल्यावर्षी अर्थातच 2023 च्या जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. यामुळे खरीप हंगाम पूर्णपणे प्रभावित झाला असून याचा फटका रब्बी हंगामाला देखील बसत आहे.
शेतकऱ्यांना कमी पावसामुळे शेतीमधून अपेक्षित अशी कमाई करता आलेली नाही. यामुळे शेतकरी राजा आर्थिक संकटात आला आहे.
दरम्यान, यावर्षी मानसून काळात चांगला पाऊस पडणार की नाही असा सवालही त्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. अशातच मात्र एलनिनो संदर्भात जागतिक हवामान संस्थेच्या माध्यमातून महत्त्वाची अपडेट समोर येत आहे.
एवढेच नाही तर भारतीय हवामान तज्ञांनी देखील आगामी काळात भारतात मान्सून कसा राहणार, मान्सूनमध्ये चांगला समाधानकारक पाऊस पडणार की नाही याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या हवामान विभागाने आणि ऑस्ट्रेलिया हवामान विभागाने एलनिनोची परिस्थिती येत्या काही महिन्यात पूर्णपणे निवळणार असल्याची भविष्यवाणी केली असून यामुळे आगामी मान्सूनमध्ये भारतात चांगला समाधानकारक पाऊस पडेल अशी आशा व्यक्त होत आहे.
जून पर्यंत सध्या सक्रिय असलेला एलनिनो समाप्त होईल अशी आशा जागतिक हवामान संस्थांनी व्यक्त केली आहे. तसेच जुलै नंतर ला-निनासाठी पोषक परिस्थिती तयार होणार असाही अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.
अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया हवामान विभागाप्रमाणे स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने देखील यंदा भारतात चांगला पाऊस होणार असा आशावाद व्यक्त केला आहे.
यावर्षी सामान्य पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना निश्चितच दिलासा मिळणार आहे. याबाबत पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव माधवन राजीवन यांनी देखील महत्वाची माहिती दिली आहे.
त्यांनी म्हटल्याप्रमाणे जून-ऑगस्टपर्यंत ला-निनाची परिस्थिती निर्माण झाल्यास गतवर्षीच्या तुलनेत यंदा मानसून काळात चांगला पाऊस होणार असा अंदाज व्यक्त केला आहे.
विशेष म्हणजे त्यांनी जून-जुलैपर्यंत ला निनाची परिस्थिती निर्माण होणारच असे म्हटले आहे. अर्थातच यंदा महाराष्ट्रासहित भारतात चांगल्या पावसाची शक्यता आहे.