Monsoon 2024 : आज फेब्रुवारीचा पहिला पंधरवाडा संपला आहे. आजपासून साडेतीन महिन्यांनी मान्सूनला सुरुवात होणार आहे. खरे तर गेल्या वर्षी अर्थातच 2023 मधील जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या मान्सून काळात खूपच कमी पाऊस बरसला.
पावसाचे प्रमाण कमी राहिल्यामुळे खरीप हंगामातून शेतकऱ्यांना अपेक्षित अशी कमाई करता आली नाही. एवढेच नाही तर कमी पावसाचा फटका रब्बी हंगामाला देखील बसला आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांची साधी लागवडही करता आलेली नाही.
परिस्थिती एवढी बिकट बनली आहे की काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील ऐरणीवर येऊ लागला आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. गेल्यावर्षी झालेल्या कमी पावसामुळे सध्या महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती पाहायला मिळत आहे.
यामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून यावर्षी अर्थातच 2024 च्या मान्सून काळातही गेल्या वर्षी सारखीच परिस्थिती राहणार का? यावर्षी चांगला पाऊस पडणार की नाही असे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान याच संदर्भात आता काही जागतिक हवामान संस्थांनी महत्त्वाची अपडेट दिली आहे. तसेच हवामान विभागाच्या काही शास्त्रज्ञांनी एलनिनोचा प्रभाव जून पर्यंत संपेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
जगभरातील हवामानावर परिणाम करणारा एल निनोचा प्रभाव येत्या काही महिन्यात संपणार असून यानंतर ला निना सक्रिय होणार असे काही हवामान संस्थेच्या माध्यमातून समोर आले आहे. दरम्यान याबाबत भारतीय हवामान तज्ञांनी देखील माहिती दिली आहे.
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव माधवन राजीवन यांनी लोकमत या प्रतिष्ठित वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार जून-जुलै पर्यंत ला निनाची परिस्थिती तयार होण्याची शक्यता आहे.
असे झाल्यास गतवर्षीच्या तुलनेत यंदा चांगला पाऊस होणार असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. एकंदरीत यावर्षी मान्सून वेळेवर दाखल होईल आणि यंदा मान्सून काळात चांगला पाऊस होईल अशी शक्यता सध्या स्थितीला व्यक्त केली जात आहे.
तथापि काही हवामान शास्त्रज्ञांनी आत्तापासूनच याबाबत अंदाज वर्तवणे थोडे घाईचे होणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे भारतीय हवामान विभागाचा एप्रिल महिन्यातील मान्सून बाबतचा पहिला अहवाल आल्यानंतरच यंदा मान्सून कसा राहणार हे स्पष्ट होणार आहे.
मात्र सध्याच्या परिस्थितीवरून आणि काही जागतिक हवामान संस्थांनी यावर्षी एलनिनो जाईल आणि ला निना येईल असे म्हटले असल्याने यंदाच्या मान्सून काळात चांगला पाऊस होऊ शकतो. निश्चितच यावर्षी चांगला पाऊस झाला तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.