Monsoon 2024 : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. हवामान खात्याने आजपासून पुढील तीन दिवस राज्यात पुन्हा एकदा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात तसेच मराठवाडा आणि विदर्भात या काळात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, संपूर्ण देशभरात मुसळधार पावसानंतर आता वातावरण अगदीच आल्हाददायक झाले आहे. अशातच मात्र हवामान विभागाने मान्सून 2024 संदर्भात नुकतीच एक नवीन अपडेट दिली आहे.
आय एम डी ने म्हटल्याप्रमाणे, यंदा मान्सूनचा परतीचा प्रवास लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार, दिल्ली आणि त्याच्या शेजारच्या भागात सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस पडू शकतो.
आयएमडीच्या म्हणण्यानुसार, यावेळी दिल्लीतून मान्सूनचा परतीचा प्रवास ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लांबणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की दरवर्षी राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरातुन सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होत असते.
या भागात सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनचा पाऊस थांबत असतो. यंदा मात्र मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला चांगलाच विलंब होण्याची शक्यता आहे. गेल्या सात दिवसांत उत्तर-पश्चिम भारतात सामान्यपेक्षा ७२% जास्त पाऊस झाला आहे. पण, भारताच्या दक्षिण भागात सामान्यपेक्षा 86% कमी पावसाची नोंद झाली आहे.
मान्सूनचा परतीचा प्रवास कधी सुरू होणार?
हवामान खात्याच्या (आयएमडी) मते, यावेळी मान्सून परत जाण्यास उशीर होण्याचे कारण म्हणजे अजूनही राजस्थानसह वायव्य भारतातील वातावरणात बाष्प आहे. यामुळे मान्सून संथ गतीने माघारी जात आहे.
खरे तर दरवर्षी राजस्थान सह वायव्य भारतातून 17 सप्टेंबर पासून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होत असते. यंदा मात्र हा प्रवास अजून सुरूचं झालेला नाही. म्हणजेच नियोजित वेळ उलटूनही अजून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झालेला नाही.
पण, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हा प्रवास सुरू होण्याची अपेक्षा आहे. यामुळे भारतातून मान्सून माघार घेण्यास 10-15 दिवस उशीर होईल असे काही तज्ञांचे म्हणणे आहे.
IMD नुसार, येत्या आठवड्यात देशभरात, विशेषतः उत्तर मैदानी भागात आणि ईशान्य भारतात तुलनेने कोरडी परिस्थिती राहणार आहे. दरवर्षी मान्सून 25 सप्टेंबरपर्यंत दिल्लीतून निघतो, परंतु यावेळी 10 ते 15 दिवसांचा विलंब होऊ शकतो.
त्याच वेळी, आणखी एक प्रणाली बंगालच्या उपसागरात येणार आणि नंतर ती अंतर्देशीय क्षेत्राकडे सरकणार असा अंदाज आहे ज्यामुळे पुढील आठवड्यात 25-26 सप्टेंबरच्या सुमारास दिल्लीत पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास हा नियोजित वेळेच्या पुढे लांबून शकतो.