Monsoon 2024 : भारतीय शेती ही सर्वस्वी मान्सूनवर आधारित आहे. मान्सून सर्वसाधारण राहिला, मान्सून मध्ये चांगला पाऊस झाला तर शेतीमधून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते. भारताची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून असल्याने मान्सून चांगला असला तर अर्थव्यवस्थेला गती मिळते नाही तर अर्थव्यवस्थेवर देखील विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.
गेल्यावर्षी अर्थातच 2023 च्या मान्सूनवर एल निनो चा प्रभाव पाहायला मिळाला होता. यामुळे गेल्या वर्षी मानसून काळात खूपच कमी पाऊस बरसला. राज्यात सरासरीच्या तुलनेत 12% कमी पावसाची हजेरी लागली. यामुळे शेती पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.
राज्यातील सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव, बीड, हिंगोली, जालना, अकोला, अमरावती, इत्यादी जिल्ह्यांमध्ये अपुऱ्या पावसाची नोंद करण्यात आली. यामुळे राज्यातील अनेक भागात आत्तापासूनच पाण्याचे संकट घोंगावू लागले आहे. आगामी काळात पाण्याचे संकट आणखी तीव्र होणार असा अंदाज आहे.
काही ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी देखील सर्वसामान्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. यामुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच मात्र 2024 चा पावसाळा कसा राहणार, आगामी पावसाळ्यावर एलनीनोचा प्रभाव राहणार का ? याबाबत हवामान अभ्यासाकांनी मोठी माहिती दिलेली आहे.
कसा राहणार 2024 चा पावसाळा
हवामान अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार एलनिनोचा प्रभाव येत्या दोन महिन्यात ओसरण्याची शक्यता आहे. असे झाले तर आगामी पावसाळ्यासाठी ही सकारात्मक बाब राहणार आहे. यामुळे आगामी पावसाळी काळात चांगला पाऊस होईल असा अंदाज आता व्यक्त होत आहे.
अमेरिकी हवामान शास्त्र संस्था नोआने प्रशांत महासागरातील एलनिनोचा प्रभाव येत्या दोन महिन्यात कमी होण्याची शक्यता वर्तवली आहे. आगामी मान्सून हंगामाच्या आधीच प्रशांत महासागरातील तापमान सर्वसाधारण पातळीवर येणार आहे.
यामुळे यंदाच्या मानसून काळात सर्वसाधारण पाऊस होणार असे सांगितले जात आहे. हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी सांगितल्याप्रमाणे, एप्रिल ते जून महिन्यात प्रशांत महासागराचं तापमान न्यूट्रल होण्याची शक्यता आहे. ही शक्यता 73 टक्के आहे.
एवढेच नाही तर ऑगस्ट ते सप्टेंबर 2024 या कालावधीत प्रशांत महासागराचं तापमान आणखी कमी होणार असा अंदाज आहे. तसेच, त्या भागात ला निना निर्माण होण्याची शक्यता 50 ते 60 टक्के आहे. म्हणजे ला निनासाठी सुद्धा पोषक हवामान तयार होणार आहे.
दरम्यान असे झाले म्हणजे एलनिनो चा प्रभाव कमी झाला आणि ला निना आला तर मान्सून काळात सर्वसाधारण ते सरासरीहून अधिक पाऊस पडू शकतो असा अंदाज तज्ञांनी दिला आहे.
एकंदरीत यंदाच्या मान्सून काळात सर्वसाधारण पाऊस बरसणार असा अंदाज देण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्रासहित संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळेल आणि पीक उत्पादनात वाढ होईल अशी आशा आहे.