Monsoon 2024 : गेल्या वर्षी महाराष्ट्रासहित संपूर्ण भारतात मान्सूनकाळात खूपच कमी पाऊस झाला. जून ते सप्टेंबर 2023 या चार महिन्यांच्या काळात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची हजेरी लागली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कमी पावसामुळे आत्तापासूनच राज्यातील अनेक भागात जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
त्यामुळे 2024 मध्ये पाऊसमान कसे राहणार, पावसाळा कसा राहणार हा मोठा सवाल सर्वसामान्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. दरम्यान आज आपण याच संदर्भात महत्त्वाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
खरेतर अमेरिकी हवामानशास्त्र संस्था- नोआच्या क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने (सीपीसी) नुकताच एक महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला आहे. या संस्थेने एलनिनो संदर्भात आणि ला निना संदर्भात माहिती दिली आहे. गेल्या वर्षी प्रशांत महासागरात एलनिनो सक्रिय होता.
त्यामुळे गेल्या वर्षी मान्सून काळात अपेक्षित असा पाऊस झाला नाही. महाराष्ट्रातील अनेक भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती तयार झाली. यामुळे हिवाळ्यातच अनेक ठिकाणी धरणांनी तळ गाठला. विहिरी देखील कोरड्या झाल्या आहेत. यंदा मात्र ही परिस्थिती बदलणार आहे.
कारण की, अमेरिकन हवामान विभागाने येत्या जून ते ऑगस्ट दरम्यान प्रशांत महासागरात ‘ला निना’ची स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे. या कालावधीत ला निना स्थिती निर्माण होण्याची शक्यता ६२ टक्के असल्याचे सदर संस्थेने म्हटले आहे.
संस्थेने वर्तवल्याप्रमाणे जर प्रशांत महासागरात आगामी मान्सून काळात ला निना तयार झाला तर येत्या पावसाळ्यात चांगला पाऊस बरसेल अशी आशा व्यक्त होत आहे. या संस्थेने आपल्या नवीनतम हवामान अंदाजात असे म्हटले आहे की, ‘एल निनो’चा प्रभाव या चालू महिन्यात कमी होईल.
तसेच एप्रिल ते जून दरम्यान प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान त्याच्या सर्वसाधारण पातळीवर म्हणजेच न्यूट्रलवर (सरासरी तापमानाच्या ०.५ अंश सेल्सिअस कमी- अधिक) येण्याची शक्यता आहे. ही शक्यता ८३ टक्के एवढी राहणार आहे.
तसेच जून ते ऑगस्ट या मान्सून हंगामाच्या पहिल्या तीन महिन्यांत विषुववृत्तीय प्रशांत महासागराचे तापमान आणखी कमी होण्याची शक्यता असून, तिथे ‘ला निना’ निर्माण होण्याची शक्यता ६२ टक्के असल्याचे म्हटले आहे.
हेच कारण आहे की यंदा चांगला पाऊस बरसणार असा अंदाज आहे. ला निना राहिला तर म्हणजे प्रशांत महासागराचे तापमान सरासरीपेक्षा कमी राहिले तर चांगला पाऊस होतो.
पण तापमान न्यूट्रल राहिले तर याचा मान्सूनवर कोणताच परिणाम होत नाही. यामुळे या संस्थेचा हा सुधारित अंदाज शेतकऱ्यांसाठी दिलासादायी ठरणार असे बोलले जात आहे.