Monsoon 2024 : लवकरच सप्टेंबर महिन्याला सुरुवात होणार आहे. म्हणजेच मान्सूनचे तीन महिने जवळपास संपले आहेत. या तीन महिन्यात जून महिना सोडला तर उर्वरित काळात महाराष्ट्रात चांगला दमदार पाऊस झाला आहे. दरवर्षी सप्टेंबर महिना सुरू झाला की परतीच्या पावसाचे वेध लागते. परतीचा पाऊस सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून सुरू होतो.
सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात राजस्थानसहित देशाच्या अनेक भागांमधून मान्सून पूर्णपणे माघारी फिरत असतो. मात्र मान्सूनचा यंदाचा परतीचा प्रवास सुरू होण्याआधीच देशात एक आसमानी संकट उभे ठाकले आहे.
यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. भारतीय हवामान खात्याने गुजरात मध्ये चक्रीवादळाची शक्यता व्यक्त केली आहे. आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार, सध्या गुजरात मध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
त्यामुळे त्या ठिकाणी पावसाने हाहाकार माजवला आहे. गुजरात मध्ये सुरू असणाऱ्या जोरदार ते अतिजोरदार पावसामुळे तेथील सामान्य जनजीवन विस्कळीत होत आहे. गुजरात मधील शेती पिकांना देखील जोरदार पावसाचा फटका बसत आहे.
मात्र अशा या परिस्थितीतच गुजरात मध्ये तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र होईल आणि याचे रूपांतर चक्रीवादळात होणार अशी भीती हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे गुजरात सहित संपूर्ण देशात चिंतेचे वातावरण पाहायला मिळतय.
सध्या गुजरात मध्ये मुसळधार पावसाने त्राहीमाम माजवला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवावे लागले आहे. गुजरात प्रमाणे देशातील इतरही अनेक राज्यांमध्ये मान्सून आता पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे.
पण आपल्या महाराष्ट्रात मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर फारच कमी झाल्याचे दिसत आहे. आय एम डी ने राज्याच्या कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथा परिसरावर जोरदार पावसाचा अंदाज दिला होता.
पण, सध्या तरी महाराष्ट्रात पावसाचा लपंडाव पाहायला मिळत आहे. राज्याच्या बहुतांशी भागांमध्ये ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. पुण्यासहित राज्याच्या अनेक भागांमधील नागरिकांना असाच अनुभव येत आहे.
तथापि, भारतीय हवामान खात्याने उत्तर कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथा परिसरात देखील जोरदार ते अति जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. दक्षिण कोकणातही जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो असे बोलले जात आहे.