Mofat Gas Cylinder Yojana : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचा थरार रंगणार आहे. या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी विविध योजनांची घोषणा करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजना आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या अशाच महत्त्वाकांक्षी योजना आहेत.
यातील लाडकी बहिण योजनेचा प्रत्यक्ष लाभही मिळू लागला आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा जीआर देखील निर्गमित झाला आहे. अन्नपूर्णा योजना अंतर्गत पात्र महिलांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत भरून दिले जाणार आहेत.
या योजनेचा राज्यातील उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे. मात्र या योजनेचा लाभ हवा असेल तर लाभार्थ्यांना ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
यासाठी संबंधित गॅस वितरकाकडे भेट द्यावी लागणार आहे. गॅस वितरकाकडे फिंगरप्रिंट किंवा फेशिअल व्हेरिफिकेशनद्वारे ग्राहकाचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण केले जाणार आहे. तसेच एच.पी. पे. अॅपवरून सेल्फ ई- केवायसी करता येणार आहे.
अन्नपूर्णा योजनेअंतर्गत फक्त केवायसी केलेल्या पात्र लाभार्थ्यांना तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. यामुळे ज्यांनी अजून केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल त्यांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. दरम्यान आता आपण अन्नपूर्णा योजनेचे स्वरूप थोडक्यात जाणून घेणार आहोत.
कशी आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना
मध्यप्रदेश राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासनाने लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. ज्या दिवशी लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली त्याच दिवशी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची देखील घोषणा करण्यात आली आहे.
अन्नपूर्णा योजनेअंतर्गत एका वर्षात पात्र लाभार्थ्याला तीन गॅस सिलेंडर मोफत भरून दिले जाणार आहेत. यासाठी राज्यातील उज्वला योजनेच्या लाभार्थी आणि लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी पात्र ठरणार आहेत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना ऑनलाइन गॅस बुकिंग करावी लागणार आहे. विशेष म्हणजे गॅस बुकिंग केल्यानंतर गॅस एजन्सी कडून गॅसची संपूर्ण रक्कम देखील वसूल केली जाणार आहे.
म्हणजेच गॅस सिलेंडरची रक्कम आधी गॅस एजन्सी कडून वसूल केली जाईल आणि यानंतर शासनाकडून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम वर्ग केली जाणार आहे. ग्राहकांनी गॅस एजन्सीकडून सिलिंडर खरेदी केल्यानंतर तीन सिलिंडरची रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये अनुदानाच्या रूपात जमा होणार आहे.
मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठीपात्र महिलांच्या नावे गॅस कनेक्शन असणे आवश्यक आहे. जर कुटुंबप्रमुख पुरुषाच्या नावावर गॅस कनेक्शन असेल तर अशा कुटुंबातील महिला पात्र असूनही या लाभासाठी अपात्र ठरतील.