Mofat Gas Cylinder Yojana : महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची आणि अन्नपूर्णा योजनेची मोठी चर्चा सुरू आहे. यातील मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपयांची भेट मिळणार आहे. म्हणजेच या योजनेच्या पात्र महिलेला एका वर्षात 18 हजार रुपये मिळणार आहेत.
यासाठी एक जुलैपासून अर्ज भरले जात असून 31 ऑगस्ट अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक आहे. या अंतर्गत राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या अन निराधार महिलांना लाभ दिला जाणार आहे.
याचा लाभ वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना मिळणार आहे. या योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे येत्या काही दिवसांनी पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत लाडक्या बहिणीसाठी दोन कोटी अर्ज सादर झाले आहेत. विशेष म्हणजे यासाठी अजूनही अर्ज केले जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल लाडक्या बहिणींना येत्या तीन दिवसांनंतर पंधरा हजार रुपये देण्याची कारवाई सुरू होईल अशी माहिती दिली आहे.
19 ऑगस्ट पर्यंत म्हणजेच रक्षाबंधनापर्यंत राज्यातील पात्र महिलेला या योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत. दुसरीकडे नुकत्याच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा देखील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील उज्वला योजनेच्या लाभार्थी महिलांना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. या योजनेचा लाभ कुटुंबातील फक्त एकाच महिलेला मिळणार आहे.
तसेच ज्या महिलेच्या नावावर गॅस जोडणी असेल त्याच महिलेला याचा लाभ घेता येणे शक्य होणार आहे. दरम्यान आता या योजने संदर्भात राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या माध्यमातून एक आवाहन करण्यात आले आहे.
ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्या महिलांनी लवकरात लवकर संबंधित गॅस एजन्सीकडे जाऊन ई- केवायसी करून घ्यावी असे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले आहे. तसेच लाभार्थ्यांचे बँक खाते देखील आधार कार्ड सोबत लिंक करावे लागणार आहे.
ज्या महिला हे दोन्ही काम पूर्ण करतील त्यांनाचं या योजनेचा लाभ मिळवता येणार आहे. यामुळे महिलांनी लवकरात लवकर गॅस एजन्सीकडे जाऊन ई- केवायसी करून घ्यावी आणि लाभार्थ्यांचे बँक खाते देखील आधार कार्ड सोबत लिंक करावे लागणार आहे.