Modi Government Scheme : केंद्रातील मोदी सरकारच्या माध्यमातून सत्ता स्थापित केल्यापासून आतापर्यंत सर्वसामान्यांसाठी विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. गरजवंत नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी शासनाकडून आतापर्यंत अनेक कौतुकास्पद योजना सुरू झाल्या आहेत.
गेल्यावर्षी अर्थातच 2023 मध्ये विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधून केंद्रातील मोदी सरकारने पीएम विश्वकर्मा नावाची एक नवीन योजना सुरू केली आहे. या अंतर्गत कुशल कारागिरांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून 18 व्यवसायाशी संबंधित कारागिरांना तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होणार आहे.
विशेष म्हणजे केंद्राकडून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या या कर्जासाठी कोणत्याही हमीची गरज भासणार नाही तसेच कर्जासाठी खूपच वाजवी व्याजदर आकारले जाणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण केंद्रातील मोदी सरकारने सुरू केलेल्या या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
किती कर्ज मिळणार
पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत संबंधित पात्र लाभार्थ्यांना दोन टप्प्यात तीन लाख रुपयांचे कर्ज मिळणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात एक लाख रुपयाचे कर्ज दिले जाईल.
या कर्जाची यशस्वी परतफेड केल्यानंतर सदर लाभार्थ्याला दुसऱ्या टप्प्यात दोन लाख रुपयांचे कर्ज मिळणार आहे. विशेष म्हणजे यासाठी हमीदाराची गरज राहणार नाही. तसेच या कर्जासाठी फक्त पाच टक्के एवढे व्याज दर लागू राहणार आहे.
आणखी काय लाभ मिळणार
या योजनेअंतर्गत संबंधित कारागिरांना प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. प्रशिक्षणासाठी पाचशे रुपयांचा भत्ता देखील मिळणार आहे. प्रशिक्षणामुळे कारागिरांना आणखी निपुणता प्राप्त होणार आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या व्यवसायात चांगली कामगिरी करता येईल आणि आर्थिक प्रगती साधता येईल असा विश्वास व्यक्त होत आहे.
कोणाला मिळणार लाभ
या योजनेचा देशातील 18 व्यवसायाशी संबंधित पारंपारिक कारागिरांना लाभ दिला जाणार आहे. रंगकाम करणारे रंगारी, सुतार, लोहार, नाव, होडी तयार करणारे, कुंभार, मुर्तीकार, मिस्री, मासळी पकडण्यासाठी जाळे विणणारे, टूलकिट उत्पादक, दगडकाम करणारे, चांभार, टोकरी, चटई, झाडू तयार करणारे, खेळणी उत्पादक, परीट इत्यादी कारागिरांना या योजनेअंतर्गत कर्ज आणि प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे.
योजनेसाठीच्या आवश्यक पात्रता
या योजनेचा लाभ फक्त आणि फक्त भारतीय नागरिकांना मिळणार आहे. या योजनेत समाविष्ट असलेल्या 18 व्यवसायांपैकी एका व्यवसायात सदर कारागीर निपुण असावा. त्याने त्या व्यवसायात मान्यताप्राप्त संस्थेकडून प्रमाणपत्र मिळवलेले असणे आवश्यक आहे.
या योजनेत 140 जाती समाविष्ट करण्यात आल्या असून सदर अर्जदार यापैकी कोणत्यातरी एका जातीतला असावा, अशा पात्रता ठरलेल्या आहेत.
कोण-कोणती कागदपत्रे लागणार
या योजनेच्या लाभासाठी काही आवश्यक कागदपत्रे लागणार आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल क्रमांक, बँक पासबुक, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, रहिवासी दाखला इत्यादी महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. pmvishwakarma.gov.in या वेबसाईटवर जाऊन इच्छुकांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.