Modi Awas Yojana : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. यामध्ये ज्या लोकांना राहण्यासाठी पक्के घर नाही अशा लोकांसाठी सुरु करण्यात आलेल्या घरकुल योजनेचा देखील समावेश होतो.
महाराष्ट्रात विविध घरकुल योजना सुरू आहेत. यात अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांसाठी रमाई आवास योजना, अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांसाठी शबरी आवास योजना तसेच अलीकडे सुरू करण्यात आलेल्या मोदी आवास योजनेचा देखील समावेश होतो.
खरेतर मोदी आवास योजना ही राज्यातील ओबीसी समाजातील नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली घरकुल योजना आहे. आता मात्र शासनाने नवीन निर्णय घेऊन या योजनेची व्यापकता वाढवली आहे.
यानुसार विमुक्त जाती आणि भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांना देखील मोदी आवास योजनेअंतर्गत आता घरकुल उपलब्ध करून दिले जाणार आहे.
दरम्यान याच मोदी आवास योजनेबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार परभणी जिल्ह्यात मोदी आवास योजनेअंतर्गत 13465 घरकुलांना मंजुरी मिळाली आहे.
यामध्ये ओबीसी समाजातील नागरिकांचा तसेच विमुक्त जाती आणि भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांचा देखील समावेश आहे.
आता आपण जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यासाठी किती घरकुल मंजूर झाले आहेत आणि जिल्ह्यासाठी मोदी आवास योजनेअंतर्गत किती घरकुलाचे उद्दिष्टे ठेवण्यात आले आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
कोणत्या तालुक्यासाठी किती घरकुले मंजूर झालीत
मिळालेल्या माहितीनुसार, परभणी जिल्ह्यात 13 हजार 596 एवढी घरे मोदी आवास योजनेअंतर्गत तयार करण्याचे उद्दिष्टे ठेवण्यात आले आहे. त्यापैकी 13465 घरांना मंजुरी देखील मिळाली आहे.
यामध्ये परभणी तालुक्यात २ हजार ३५७ घरकुल, जिंतूरमध्ये ३ हजार ५९९ घरकुल, सेलू तालुक्यात १ हजार ४६२ घरकुल, मानवत तालुक्यात ६२४ घरकुल, पाथरी तालुक्यात ९४५ घरकुल, सोनपेठ तालुक्यात ८६१ घरकुल, गंगाखेड तालुक्यात १ हजार ३४३, पालम तालुक्यात १ हजार ३१०, पूर्णा तालुक्यातील १ हजार ९५ घरकुलांना मंजुरी मिळाली असल्याची माहिती एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे. यामुळे ओबीसी समाजातील गरजवंत नागरिकांना हक्काचे घर उपलब्ध होणार आहे.