Michaung Storm : बंगालच्या उपसागरात एक नवीन चक्रीवादळ तयार झाले आहे. याला मिचाँग या नावाने ओळखले जात आहे. याचा परिणाम म्हणून राज्यासह देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खरे तर, या वादळाचा थेट महाराष्ट्रावर परिणाम होणार नाहीये.
पण, चक्रीवादळामुळे वातावरणात मोठे बाष्प जमा होत असून याचा परिणाम म्हणून राज्यातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. वास्तविक गेल्या महिन्यातील शेवटच्या आठवड्यात राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस झाला होता.
यानंतर डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला पावसाची तीव्रता थोडीशी कमी झाली. यामुळे आता राज्यातून अवकाळी पाऊस परत जाणार आणि हळूहळू थंडीला सुरुवात होणार असे वाटत होते. मात्र असे काही झाले नाही राज्यात अजूनही अवकाळी पावसाचे सत्र सुरूच आहे.
अशातच, भारतीय हवामान खात्याने 4 डिसेंबर ते आठ डिसेंबर दरम्यान राज्यातील हवामान कसे राहणार याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये ५ व ६ डिसेंबरला तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या विभागात आग्नेयकडील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस हजेरी लावणार असे आयएमडीने स्पष्ट केले आहे. तसेच विदर्भात सुद्धा पुढील ४८ तास हलका पाऊस बरसणार असे भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून सांगितले गेले आहे.
तसेच त्यानंतर ४८ तास विदर्भात मेघगर्जनेसह काही ठिकाणी पाऊस होणार असा अंदाज आहे. तसेच यां काळात सोसाट्याचे वारे देखील वाहणार आहेत. विदर्भात प्रामुख्याने चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
येत्या 2 दिवसांनी म्हणजे ६ डिसेंबरला भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली येथे पाऊस होणार आहे. पण यानंतर राज्यात हवामान कोरडे होणार आहे. हवामान तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे ८ तारखेनंतर राज्यात हवामान कोरडे होणार आहे आणि किमान तापमानात घट होणार अशी शक्यता आहे.
महाराष्ट्रातील हवामानासंदर्भात जेष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी देखील महत्त्वाची माहिती दिली आहे. खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील मराठवाडा विभागातील लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली व या जिल्ह्यात ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी गुरुकुल पाऊस पडणार आहे.
तसेच विदर्भात देखील ढगाळ वातावरणसहित तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. पण ८ डिसेंबरपासून अर्थातच येत्या शुक्रवारपासून राज्यातील हवामान कोरडे होणार आहे. 8 डिसेंबर नंतर मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे होणार आहे.
ढगाळ वातावरण पूर्णपणे निवळेल आणि हळूहळू थंडीला सुरवात होणार असा अंदाज त्यांनी बांधला आहे. त्यामुळे, गेल्या महिन्यात सुरू झालेल्या अवकाळी पावसाचे सत्र महाराष्ट्रात आगामी काही दिवस आणखी कायम राहण्याची शक्यता आहे.