Michaung Cyclone Latest News : राज्यासह देशातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदल होत आहे. राज्यात तर गेल्या महिन्यात अवकाळी पावसाने पार थैमान माजवले होते. 25 नोव्हेंबर पासून सुरू झालेला अवकाळी पाऊस अजूनही राज्यातील विविध भागांमध्ये बरसत आहे.
पण आता राज्यातील पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. गेल्या महिन्यात जेवढी पावसाची तीव्रता होते तेवढी तीव्रता आता राहिलेली नाही. अशातच मात्र हवामान खात्याच्या माध्यमातून देशातील हवामाना संदर्भात एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे.
हवामान खात्याने बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून हे कमी दाबाचे क्षेत्र 3 डिसेंबर पर्यंत चक्रीवादळात परावर्तित होईल असे सांगितले आहे. दरम्यान या चक्रीवादळाला मिचॉन्ग असे नाव देण्यात आले आहे.
मिचॉन्ग चक्रीवादळ ४ डिसेंबरच्या सकाळपर्यंत दक्षिण आंध्र प्रदेश आणि लगतच्या उत्तर तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकणार असे देखील हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
चक्रीवादळ आंध्र प्रदेश आणि लगतच्या उत्तर तमिळनाडू घेणार पट्टीवर धडकल्यानंतर ते उत्तरेकडे सरकणार असा देखील अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. याचा परिणाम म्हणून दक्षिण आणि पूर्व भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कुठं बरसणार मुसळधार पाऊस
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या या नवीन चक्रीवादळामुळे देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विशेष म्हणजे आजपासूनच पावसाला सुरुवात होणार आहे.
आज तमिळनाडूच्या उत्तर किनारपट्टी भागात आणि पद्दुचेरीमध्ये बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असे आयएमडीने सांगितले आहे.
तसेच भारतीय हवामान विभागाने, उद्यापासून अर्थातच 3 डिसेंबर 2023 पासून पावसाचा जोर वाढणार असे नमूद केले आहे.या काळात बहुतेक ठिकाणी मध्यम पाऊस होईल तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल असा अंदाज आहे.
उद्या देशातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. सोबतच 4 आणि 5 डिसेंबरला सुद्धा अनेक भागात मुसळधार पाऊस होणार असा अंदाज देण्यात आला आहे. यानंतर मात्र पावसाचा जोर कमी होत जाणार आहे.
एकंदरीत चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आजपासून ते पाच डिसेंबर पर्यंत देशातील काही भागांमध्ये मध्यम ते मुसळधार आणि अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून देण्यात आला आहे.