MHADA Lottery News : या चालू वर्षात देशभरात एकूण नऊ राज्यात विधानसभा निवडणुका सुरू होणार आहेत. तसेच पुढल्या वर्षी लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. यामुळे राज्यातही लोकसभा निवडणुकीची तयारी केली जात आहे. यासाठी सत्तापक्षाने देखील कंबर कसली आहे.
भाजपने राज्यात सुरू होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. दरम्यान मुंबई मधील सामान्य आणि मध्यमवर्गीय जनतेला खूष करण्यासाठी देखील भाजपकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.
याचाच एक भाग म्हणून भाजपच्या वतीने म्हाडाच्या घरासाठी वास्तव्याची अट रद्द केली जावी ही मागणी करण्यात आली आहे. म्हाडाचे घर हे मुंबई समवेतच इतर महानगरातील मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. याच जिव्हाळ्याच्या विषयावर भाजपाने हात घातला आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, म्हाडाच्या घरांसाठी पंधरा वर्ष महाराष्ट्रात वास्तव्य असणे प्रत्येकासाठी अनिवार्य आहे. मात्र आता मराठी माणसांसाठी ही पंधरा वर्षे वास्तव्याची अट काढून टाकावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. वास्तविक गेल्या अनेक वर्षांपासून म्हाडाच्या घर सोडते संदर्भात ही मागणी मराठी माणसांकडून उपस्थित होत आहे. मात्र आता ही मागणी एका प्रमुख राजकीय पक्षाकडून उपस्थित होत असल्याने याची चांगलीचं चर्चा रंगत आहे.
भाजपचे वांद्रे पूर्व विधानसभा सरचिटणीस प्रवीण घाडगे यांनी मराठी माणसांसाठी म्हाडाच्या घरांसाठी पंधरा वर्षे अधिवासाची अट रद्द करावी, मराठी माणसांकडून पंधरा वर्ष वास्तव्याचे प्रमाणपत्र मागू नये अशी मागणी केली आहे. घाडगे यांनी या संदर्भात म्हाडाच्या उपाध्यक्षांना लेखी निवेदन देखील दिले आहे. जसे की आपणास ठाऊकच आहे म्हाडा कोकण गृहनिर्माण मंडळ व मुंबई मंडळ यांच्याकडून शहर आणि ग्रामीण भागासाठी घरांच्या लॉटरी काढल्या जातात.
मात्र या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तींकडून पंधरा वर्षे मुंबई सह महाराष्ट्रात वास्तव्य असल्याचा अधिवास दाखला मागितला जातो. मात्र मराठी माणसांकडून हा दाखला मागू नये असं मत भाजपने व्यक्त केलं असून यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पत्राद्वारे मागणी देखील केली आहे.
दरम्यान, ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभी करण्यात आलेली मागणी आहे की खरंच यासाठी भाजप प्रयत्न करत आहे हाच मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. मात्र ही वास्तव्याची अट जर रद्द झाली तर म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी मराठी माणसांना सोयीचे होणार आहे.