Mhada Lottery News : अलीकडे, मुंबई, ठाण्यासारख्या शहरांमध्ये घर घेणे म्हणजे सर्वसामान्यांसाठी दुरापास्त गोष्ट बनली आहे. घरांच्या वाढलेल्या किमती पाहता सर्वसामान्यांना मोक्याच्या ठिकाणी घर खरेदी करता येत नाही. अशावेळी, मात्र म्हाडा प्राधिकरण सर्वसामान्यांच्या मदतीला येते.
प्राधिकरणांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी दरवर्षी हजारो घरांसाठी लॉटरी जाहीर केली जात असते. नुकत्याच काही दिवसांपूर्वी म्हाडा मुंबई मंडळाने 2030 घरांसाठी लॉटरी जाहीर केली होती. नुकतीच या घरांची संगणकीय सोडत काढण्यात आली असून आता मुंबई मंडळानंतर कोकण मंडळ देखील हजारो घरांसाठी लॉटरी जाहीर करणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कोकण मंडळाच्या माध्यमातून 12000 घरांसाठी लॉटरी जाहीर केली जाणार आहे. कोकण मंडळाच्या माध्यमातून ठाणे, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली परिसरातील घरांच्या विक्रीसाठी लवकरच लॉटरी जाहीर होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कोकण मंडळ 12,000 घरांपैकी दोन हजार घरांसाठी गुरुवारी लॉटरी जाहीर करण्याची शक्यता आहे. याची जाहिरात गुरुवारी निघेल आणि उर्वरित दहा हजार घरांची थेट विक्री केली जाणार आहे. या घरांच्या थेट विक्रीची प्रक्रिया देखील गुरुवारपासून सुरू होणार आहे.
खरंतर कोकण मंडळाकडे अनेक अशी घरे आहेत ज्यांची वारंवार सोडत काढूनही विक्री होत नाहीये. पाणी, रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने या घरांची विक्री होत नसल्याचे सांगितले जाते. मात्र आता कोकण मंडळा अंतर्गत येणाऱ्या म्हाडाच्या इमारतीच्या भागात सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
यामुळे मंडळाकडून आता या घरांसाठी लॉटरी काढली जाणार आहे. यामध्ये दहा हजार घरांची थेट विक्री केली जाणार असून यासाठी इच्छुक नागरिकांकडून गुरुवारपासून अर्ज मागवले जाणार आहेत.
तसेच गुरुवारी उर्वरित 2000 घरांसाठी लॉटरी निघणार आहे. त्यामुळे ठाणे, कल्याण डोंबिवली, वसई विरार या भागात मोक्याच्या ठिकाणी घर घेऊ पाहणाऱ्या नागरिकांचे गृह खरेदीचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे.
अशा परिस्थितीत जर तुम्हालाही या भागात घर खरेदी करायची असेल तर आत्तापासूनच पैशांची ऍडजस्टमेंट करावी लागणार आहे. या घरांच्या किमतीबाबत बोलायचं झालं तर कोकण मंडळाच्या आगामी सोडतीमध्ये समाविष्ट असणाऱ्या घरांच्या किमती वीस लाखाच्या आसपास असतील अशी शक्यता आहे.