Mhada House Lottery : तुम्हीही स्वतःचे, हक्काचे घर असावे असे स्वप्न पाहताय ना? मग तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या असून अनेकांना ड्रीम होमचे स्वीट ड्रीम पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. यातील महत्त्वाची अडचण म्हणजे पैशांची. अनेकांना पैशांअभावी आवडत्या ठिकाणी घर खरेदी करता येत नाही.
अशावेळी सर्वसामान्यांच्या मदतीला धावते ते म्हाडा. म्हाडा प्राधिकरणाच्या माध्यमातून राज्यातील विविध शहरांमध्ये सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून दिली जात आहेत. दरम्यान, म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून लवकरच लॉटरी जाहीर केली जाणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
यामुळे जर तुम्हालाही मायानगरी मुंबई स्वतःच्या हक्काचे घर खरेदी करायचे असेल तर तुम्हाला आत्तापासूनच डिपॉझिट तयार ठेवावे लागणार आहे. डिपॉझिटसाठी तुम्हाला आत्तापासूनच पैशांची जमवाजमव करावी लागणार आहे.
दरम्यान, आज आपण मुंबई मंडळाच्या 2024 च्या या पहिल्या लॉटरी बाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या लॉटरीमध्ये कोणत्या घरांचा समावेश राहणार तसेच यासाठी जाहिरात कधी निघणार या संदर्भात आता आपण माहिती पाहणार आहोत.
कधी निघणार मुंबई मंडळाच्या लॉटरीची जाहिरात
लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागले आहे ते विधानसभेच्या रणधुमाळीकडे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील नेतेमंडळी आता मोर्चेबांधणी करण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहे. राज्यातील अनेक दिगज नेत्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपावर मंथन सुरू केले आहे.
ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका होतील अशी शक्यता व्यक्त होत आहे. या विधानसभा निवडणुकांच्या आधीच म्हाडा मुंबई मंडळ 2024 ची लॉटरी काढणार आहे.
याची जाहिरात ही या चालू महिन्यातच म्हणजेच जुलैमध्येच निघणार असा दावा केला जात आहे. जाहिरात जाहीर झाल्यानंतर ऑगस्ट अखेरपर्यंत अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया सुरू राहणार आहे. यानंतर मग या घरांसाठी प्रत्यक्षात लॉटरी निघणार आहे.
कोणत्या घरांचा समावेश राहणार?
गेल्यावर्षी अर्थातच 2023 मध्ये मुंबई मंडळांनी 4 हजार 82 घरांसाठी लॉटरी काढली होती. या लॉटरीमध्ये मंडळाची अनेक घरे विकली गेली नाहीत. दरम्यान ही शिल्लक राहिलेली घरे या लॉटरीमध्ये समाविष्ट होणार आहेत. तसेच या लॉटरीत मालाड, गोरेगाव, दिंडोशी, पवई कोपरी, विक्रोळी कन्नमवार नगर भागामधील सदनिका देखील समाविष्ट केल्या जाणार आहेत.
या लॉटरीमध्ये विविध उत्पन्न गटासाठी घर उपलब्ध होणार आहे. अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी या लॉटरीत घरे राहणार आहेत. या लॉटरीत सर्वात स्वस्त घर पीएमवाय योजनेचे राहणार आहे आणि ही घरे गोरेगाव मध्ये असतील.
या 322 चौरस फूट घरांची किंमत ही 33 लाख 2 हजार रुपये एवढी राहणार आहे. तसेच पवई कोपरी येथे उच्च उत्पन्न गटातील नागरिकांसाठी उपलब्ध असणाऱ्या 900 चौरस फूट घरांची किंमत ही सर्वात जास्त राहणार आहे. या घरांची किंमत एक कोटी 60 लाख रुपये एवढी राहणार आहे.