Mazi Ladki Bahin Yojana : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी कडून आणि महायुतीकडून जोरदार तयारी केली जात आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे यामुळे त्यांना विधानसभा निवडणुकीतही चांगले यश मिळेल अशी आशा आहे.
दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत आपल्या वाटेला आलेल्या पराभवातुन धडा घेत महायुती सरकारने राज्यातील सर्वसामान्यांसाठी नवनवीन योजनांचा धडाका लावला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये शिंदे सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजनांची घोषणा केली आहे. यामध्ये महिलांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे.
महिलांना केंद्रस्थानी ठेवून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची देखील घोषणा करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे लाडकी बहिण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना याचा लाभही मिळू लागला आहे. मध्यप्रदेश राज्य सरकारच्या धर्तीवर सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत.
राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना याचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी एक जुलैपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज भरण्यास मुदत मिळाली होती. पण आता शिंदे सरकारने या योजनेचे अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
खरेतर, अजून भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील निवडणुकांच्या तारखा जाहीर केलेल्या नाहीत. यामुळे शिंदे सरकारने या गोष्टीचा फायदा घेत लाडकी बहिण योजनेचे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबतचा जीआर म्हणजे शासन निर्णय देखील जारी करण्यात आला आहे. या योजनेसाठी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार होते मात्र आता सरकारने सप्टेंबर पर्यंत मुदत वाढवून दिली आहे. यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी अजून पात्र असूनही अर्ज सादर केलेले नसतील त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी ठरणार आहे.
कशी आहे योजना ?
लाडकी बहीण योजना ही मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे. ही योजना महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये दिले जाणार आहेत. म्हणजेच एका पात्र महिलेला एका वर्षात 18000 रुपये मिळणार आहेत.
21 ते 65 वर्षे वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना याचा लाभ मिळणार आहे. कुटुंबातील एक अविवाहित महिला देखील यासाठी पात्र ठरणार आहे. वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार आहे.
फक्त महाराष्ट्रातील महिलांनाच याचा लाभ मिळेल. पण ज्या महिलांचा जन्म परराज्यात झाला आहे आणि ज्यांनी महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केले आहे अशा महिला सुद्धा याच्या लाभासाठी पात्र ठरतील.
या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या अन जुलै तसेच ऑगस्ट महिन्यात अर्ज करणाऱ्या जवळपास दीड कोटीहून अधिक महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये वितरित करण्यात आले आहेत.