Marigold Farming : अलीकडे महाराष्ट्रात फळ पिकांसमवेतच फुल पिकांची देखील मोठ्या प्रमाणात शेती होऊ लागली आहे. फुलशेतीचा विषय निघाला की सर्वप्रथम डोळ्यासमोर उभे राहते ते झेंडूचे पीक. महाराष्ट्रात झेंडूची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. झेंडूला सणासुदीच्या दिवसांमध्ये, लग्नसराई मध्ये मोठी मागणी असते.
फक्त याच काळात झेंडूला मागणी असते असे काही नाही. हे पिक तिन्ही हंगामांमध्ये उत्पादित केले जाऊ शकते आणि याला बारा महिने बाजारात मागणी असते. वेगवेगळ्या उत्सवासाठी, कार्यक्रमांसाठी झेंडू चा वापर होतो आणि यामुळे हे फुल बाराही महिने मागणीत असते.
परंतु नवरात्र, दसरा आणि दिवाळी या काळात झेंडूच्या फुलाला सर्वाधिक मागणी असते. झेंडूचे पीक हे अडीच ते तीन महिन्यात उत्पादन देण्यास तयार होते.
यामुळे नवरात्र दसरा आणि दिवाळी काळात झेंडूचे पीक तोडणीसाठी तयार होईल अशा कालावधीत याची लागवड केली तर शेतकऱ्यांना अधिकचा फायदा होऊ शकतो.
महाराष्ट्रात पुणे, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, परभणी, छत्रपती संभाजी नगर, नांदेड, अकोला आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये झेंडूची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात असल्याची माहिती तज्ञांनी दिली आहे. दरम्यान आज आपण झेंडूच्या फुलांच्या काही सुधारित जातींची अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
झेंडूच्या सुधारित जाती खालील प्रमाणे
कृषी तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार झेंडूच्या जातींचे दोन प्रकारात वर्गीकरण करण्यात आले आहे. हे वर्गीकरण प्रामुख्याने त्यांच्या उंचीनुसार अन फुलाच्या आकारानुसार करण्यात आले आहे. आफ्रिकन झेंडू आणि फ्रेंच झेंडू अशा दोन प्रकारात हे वर्गीकरण झालेले आहे.
आफ्रिकन झेंडूमध्ये कॅकरजॅक, आफ्रिकन टॅाल डबल मिक्स्ड, यलो सुप्रिम, गियाना गोल्ड, पाई, आलास्का, पुसा बसंती गेंदा या प्रमुख जाती आहेत. आफ्रिकन झेंडूच्या जाती उंचीला अधिक असतात.
या जातीची फुले ही टपोरी असतात आणि फुलांना केशरी आणि पिवळ्या रंगाच्या छटा दिसतात. ही फुले टपोरी असल्याने हार बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपयोगात आणली जातात. दुसरीकडे, फ्रेंच झेंडूची झाडे उंचीला कमी असतात.
या जातीची झाडे प्रामुख्याने झुडपा सारखी वाढतात. या जातीच्या फुलांचा आकार हा लहान ते मध्यम असतो. या जातीच्या फुलांच्या रंगांमध्ये मात्र मोठी विविधता पाहायला मिळते. फ्रेंच झेंडूमध्ये स्प्रे बटर लेमन ड्रॅाप्स, फ्रेच डबल मिक्स्ड, अर्का बंगारा या प्रमुख जातीचा समावेश केला जातो.