Mankhurd Thane Flyover : महाराष्ट्रात सध्या रस्ते विकासाची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. वेगवेगळी ग्रीन फील एक्सप्रेस वे, राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग, सागरी पूल, भुयारी बोगदे, वेगवेगळ्या उड्डाणपुलाचे काम सध्या हाती घेण्यात आले आहे. यामुळे निश्चितच महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या माध्यमातून राज्यभरात वाहतूक सुधार करण्यासाठी रस्ते विकास कामे सुरु आहेत. मुंबई महानगरात देखील वेगवेगळी कामे प्रगतीपथावर आहेत. यात छेडा नगर वाहतूक सुधारणा प्रकल्पाचा देखील समावेश आहे.
आता याच प्रकल्पाबाबत एक अपडेट हाती आल आहे. खरं पाहता सध्या या प्रकल्पातील मानखुर्द-ठाणे उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दरम्यान नुकतेच या उड्डाणपुलाचा शेवटचा गर्डर (बीम) बसवण्यात आला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने म्हणजे एमएमआरडीएने हा महामार्ग फेब्रुवारीपासून वाहतुकीसाठी सुरू करण्याचं टार्गेट ठेवल आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, 15 फेब्रुवारीपासून हा उड्डाणपूल सर्वसामान्यांच्या सेवेत दाखल होणार आहे.
निश्चितच हा पूल वाहतूक सेवेत दाखल झाल्यास छेडा नगरदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडी पासून मुक्तता मिळणार. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून प्रवास अजुनच सुरक्षित होणार आहे. याशिवाय प्राधिकरणाने असा दावा केला आहे की, हा उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर मानखुर्द-ठाणे अंतर अवघ्या पाच मिनिटांत कापणे शक्य होणार आहे. निश्चितच मानखुर्द ते ठाणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशासाठी ही एक आनंदाची पर्वणी सिद्ध होणार आहे.
जसं की आपणास ठाऊकच आहे की छेडा नगर जंक्शन येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. आता या वाहतूक कोंडीचा छेडा नगर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा अडथळा येतो. ईस्टर्न फ्रीवेवरून येणाऱ्या वाहनांना देखील यामुळे प्रवास करताना मोठी अडचण येत होती. अशा परिस्थितीत या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एमएमआरडीएने ‘छेडा नगर वाहतूक सुधारणा प्रकल्प’ हाती घेतला आहे.
आता या प्रकल्पाचे काम वेगात सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत छेडा नगरमध्ये एकूण तीन उड्डाणपूल आणि एक भुयारी मार्ग बांधण्यात येत आहे. या तीन उड्डाणपूलांपैकी पहिला पूल हा 680 मीटर लांबीचा सायन आणि ठाणे यांना जोडणारा आहे. हा पहिला उड्डाणपूल तीन पदरी आहे. तसेच दुसरा उड्डाणपूल द्विपदरी आहे.
या पुलाची लांबी 1,235 मीटर आहे. तसेच तो मानखुर्द रोडवरून थेट ठाण्याशी जोडला जाणार आहे. याशिवाय छेडानगर वाहतूक सुधारणा प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणारा तिसरा 638 मीटर लांबीचा उड्डाणपूल सांताक्रूझ ते चेंबूर रस्त्याला जोडला जाणार आहे.
या तिघापैकी 638 मीटर लांबीचा छेडा नगर उड्डाणपूल मार्च 2022 मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यासाठी 249.29 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. हा उड्डाणपूल सांताक्रूझ ते चेंबूररस्ता जोडणीसाठी उभारण्यात आला आहे. या पुलामुळे छेडा नगरमधील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होत आहे.
छेडा नगर उड्डाणपुलासह 518 मीटर लांब आणि 37.5 मीटर रुंद भुयारी मार्गाचा पहिला टप्पाही पूर्ण झाला असून तो सेवेत दाखल झाला आहे. निश्चितच, सध्या छेडानगर वाहतूक सुधारणा प्रकल्प आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. दरम्यान आता या सुधारणा प्रकल्पांतर्गत जे तीन पूल उभारले जात आहेत त्यापैकी दुसरा पूल देखील लवकरच वाहतुकीत दाखल होणार आहे.
मानखुर्द ते ठाणे उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. 15 फेब्रुवारीपासून हा देखील पूल प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याने निश्चितच या सुधार प्रकल्पाचा आता मोठा टप्पा पूर्ण होणार आहे. त्यामुळे कुठे ना कुठं वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होणार आहे.