Mango Variety : उन्हाळा लागला की बाजारांमध्ये आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक होते. साधारणता मार्च महिन्याच्या सुमारास बाजारात आंबे दाखल होऊ लागतात. गुढीपाडव्याच्या सणाला बाजारात मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक पाहायाला मिळते. त्यानंतर मग अक्षय तृतीयाच्या सणाला बाजारांमध्ये सर्वाधिक आंब्याची आवक होते.
सध्या बाजारांमध्ये तुम्हालाही मोठ्या प्रमाणात आंबे नजरेस पडत असतील. आंब्याला फळांचा राजा म्हणतात आणि आंबा पाहिला की तोंडाला पाणी सुटतं. या उन्हाच्या दिवसांमध्ये खवय्यांना आंबे खाणे विशेष आवडते.
बाजारात तुम्ही हापूस आंबा पाहिलाच असेल, पण आपल्याकडे फक्त कोकणी हापूस आंबा प्रसिद्ध आहे असे नाही. आंब्याच्या इतरही अनेक अशा प्रजाती आहेत ज्या की भारतात विशेष लोकप्रिय असून या जातींचे आंबे बाजारात नेहमीच मागणीमध्ये असतात.
दरम्यान आज आपण भारतातील टॉप पाच लोकप्रिय आंब्याच्या प्रजाती जाणून घेणार आहोत. आज आपण ज्या जातींची माहिती पाहणार आहोत त्यांना बाजारात नेहमीच पसंती मिळते.
हापूस : हापूस आंबा हा इतर सर्व आंब्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. प्रामुख्याने कोकणी हापूस आंबा हा जास्त प्रचलित आहे. याची मागणी फक्त भारतातच नाही तर विदेशात देखील मोठी आहे. यामुळे बाजारात नेहमीच हापूस आंब्याला इतर आंब्यापेक्षा अधिकचा भाव मिळतो.
याची चव, रंग आणि सुगंध यामुळे हापूस आंबा अधिक पसंत केला जातो. कोकणातील रत्नागिरी हापूस आणि देवगड हापूस हे अस्सल हापूस म्हणून ओळखले जातात. दुसरीकडे बाजारात कर्नाटकी हापूस देखील उपलब्ध होतो. पण कोकणातील हापूसची बात काही औरच आहे.
केसर : भगव्या रंगाचा हा आंबा ग्राहकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. याच्या भगव्या रंगामुळेच याला केसर असे नाव पडले आहे. गुजरात मधील जुनागडच्या गिरनार टेकड्यांमध्ये या आंब्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. येथील आंब्यांना बाजारात मोठी मागणी देखील आहे. केसर आंबा त्याच्या चवीमुळे संपूर्ण देशात लोकप्रिय आहे.
तोतापुरी आंबा : याचा आकार हा पोपटाच्या चोचीसारखा असतो तसेच रंग हिरवा असतो यामुळे याला तोतापुरी आंबा म्हणतात. हा आंबा चवीला आंबट-गोड असतो. हा आंबा याच्या चवीसाठी विशेष ओळखला जातो आणि हा ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. याचे उत्पादन भारताच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
लंगडा आंबा : उत्तर प्रदेश मधील वाराणसी या जिल्ह्यात लंगडा आंबा मोठ्या प्रमाणात उत्पादित होतो. हा आंबा खूपच रसाळ आणि गोड असतो मात्र याची साल खूप पातळ असल्याने हा आंबा चोखून खाता येत नाही. आमरस बनवण्यासाठी हा आंबा खूपच चांगला असतो.
दशेरी आंबा : उत्तर भारतातील आंब्याची एक लोकप्रिय प्रजाती म्हणून दशेरी आंबा ओळखला जातो. हा आंबा लांबट आकाराचा असतो. हा आंबा खूपच गोड असतो.