Maize Variety : सध्या महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात खरीप हंगाम प्रगतीपथावर आहे. खरीप हंगामात नेहमीप्रमाणेच याही वर्षी सोयाबीन कापूस मका अशा विविध पिकांची लागवड होणार आहे. मक्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर हे तृणधान्य पीक राज्याच्या जवळपास सर्व जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात लावले जाते. हे तृणधान्याचे एक मुख्य पिक असुन याचे अनेक उपयोग आहेत. मक्याची लागवड ही प्रामुख्याने धान्य आणि चाऱ्यासाठी केली जाते.
धान्यासाठी याची व्यवसायिक शेती होते तर राज्यातील अनेक पशुपालक शेतकरी बांधव आपल्या गुराढोरांसाठी मक्याची चारा पीक म्हणून लागवड करतात. मकापासून अनेक खाद्यपदार्थ बनवले जातात. अमेरिकेत प्रथम गेलेल्या यूरोपियन लोकांनी मक्याला ‘इंडियन कॉर्न’ हे नाव दिले ते आजही ‘कॉर्न’ या संक्षिप्त रूपात प्रचलित आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये मक्याला बाजारात चांगला दर मिळत आहे. यामुळे याची लागवड शेतकऱ्यांसाठी फायद्याचा सौदा सिद्ध झाली आहे. मक्याचा पोल्ट्री उद्योगात मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने आणि यापासून इथेनॉल ची आता मोठ्या प्रमाणात निर्मिती होत असल्याने याला बाजारात मागणी वाढली असून बाजार भाव देखील समाधानकारक पातळीवर पोहोचले आहेत.
गेल्या वर्षी तर सोयाबीनच्या उत्पादनात घट आल्यामुळे पोल्ट्री उद्योगात याची मागणी वाढली होती आणि ऊस उत्पादनात घट आल्यामुळे साखरेच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी इथेनॉल निर्मितीमध्ये याचा कमी वापर करून मक्याचा वापर वाढवण्यात आल्यामुळे मक्याला चांगला दर मिळाला होता.
हेच कारण आहे की यंदा मका लागवड वाढू शकते असे चित्र तयार होत आहे. अशा परिस्थितीत, आज आपण मक्याच्या काही प्रमुख संकरित जातींची माहिती जाणून घेणार आहोत. खरे तर बाजारात विविध प्रकारचे स्थानिक आणि संकरित वाण उपलब्ध आहेत. पण स्थानिक वाणांच्या तुलनेत संकरित वाणापासून अधिकचे उत्पादन मिळत आहे.
मात्र संकरित वाण हे स्थानिक वाणांच्या तुलनेत उशिराने पक्व होतात. उत्पादनाचा विचार केला तर स्थानिक वाणांपेक्षा संकरित वाणांपासून 60 ते 80 टक्के अधिकचे उत्पादन मिळते. म्हणजे संकरित वाणांची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. यामुळे आज आपण राज्यात लागवडीसाठी उपयुक्त काही प्रमुख संकरित जातींची माहिती पाहणार आहोत.
मक्याच्या प्रमुख संकरित जाती खालील प्रमाणे
संगम : संगम हे एक प्रमुख संकरित वाण आहे. पेरणी केल्यानंतर जवळपास 105 ते 110 दिवसात या जातीचे पीक परिपक्व होत असल्याची माहिती तज्ञांनी दिली आहे. या जातीपासून शेतकऱ्यांना एवरेज 75 ते 80 क्विंटल प्रति हेक्टर पर्यंत उत्पादन मिळते.
कुबेर : मक्याचा हा देखील एक संकरित वाण असून या जाती पासून शेतकऱ्यांना चांगले विक्रमी उत्पादन मिळत आहे. अवघ्या 100 ते 110 दिवसात परिपक होणाऱ्या या जातीपासून शेतकऱ्यांना 75 ते 80 क्विंटल प्रति हेक्टर पर्यंतचे विक्रमी उत्पादन मिळत असल्याची माहिती दिली जात आहे. विशेष म्हणजे या जातीपासून चांगला चाराही शेतकऱ्यांना मिळतो.
बायो 9681 : इतर संकरित जातींप्रमाणेच या जातीलाही परिपक्व होण्यासाठी सरासरी 110 दिवसांचा कालावधी लागतो. वर नमूद केलेल्या दोन जातींपेक्षा या जातीचे उत्पादन काहीसे कमी आहे. या जातीपासून सरासरी 60 ते 70 क्विंटल प्रति हेक्टर पर्यंत उत्पादन मिळते.
एचक्युपीएम 5 : या जातीपासून देखील शेतकऱ्यांना 55 ते 60 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळते. सरासरी 100 ते 110 दिवसात या जातीचे पीकही परिपक्व होते. मक्याची ही देखील एक संकरित जात आहे.