Maharashtra Women Government Scheme : महाराष्ट्र राज्य सरकारने नुकत्याच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयांची भेट मिळणार आहे. म्हणजेच एका पात्र महिलेला एका वर्षात 18 हजार रुपयांची भेट होणार आहे. यासाठी सध्या अर्ज स्वीकारले जात आहेत.
यासाठी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहे. यामुळे सध्या या योजनेचे अर्ज सादर करण्यासाठी महिला वर्गाची मोठी धावपळ सुरू आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसोबतच राज्यातील महिलांसाठी महायुती सरकारने अन्नपूर्णा योजनेची देखील घोषणा केली आहे.
पण राज्यातील महिलांसाठी फक्त लाडकी बहीण योजना हीच एक मात्र योजना सुरू आहे असे नाही तर राज्य सरकारकडून महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. अशा परिस्थितीत आज आपण महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू असणाऱ्या राज्यातील पाच महत्त्वाच्या योजना संदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना : महायुती सरकारने या योजनेची घोषणा अर्थसंकल्प 2024-25 मध्ये केली. त्यानंतर या योजनेचा शासन निर्णय निघाला. सध्या या योजनेसाठी अर्ज स्वीकारले जात आहेत. या अंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना या अंतर्गत लाभ मिळणार आहे.
वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यां कुटुंबातील महिला यासाठी पात्र राहणार आहेत. या योजनेची अंमलबजावणी जुलै महिन्यापासून होणार आहे. म्हणजेच महिलांना जुलै महिन्याचे देखील पैसे दिले जाणार आहेत. या योजनेअंतर्गत दिले जाणारे पैसे येत्या दोन-तीन दिवसांनी महिलांच्या बँक खात्यात वर्ग केले जाणार आहेत.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना : शिंदे सरकारने जाहीर केलेल्या या योजनेअंतर्गत राज्यातील उज्वला योजनेच्या आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभार्थ्यांना एका वर्षात तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. मात्र यासाठी संबंधित पात्र लाभार्थी महिलेच्या नावाने गॅस कनेक्शन असणे आवश्यक राहणार आहे. सोबतच या योजनेचा लाभ कुटुंबातील फक्त एका पात्र महिलेला मिळणार आहे.
एसटी प्रवासात 50 टक्के सवलत : शिंदे सरकारने महाराष्ट्रातील महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय गेल्यावर्षी म्हणजे 2023 मध्ये घेण्यात आला आहे. या योजनेचा लाभ साधी, मिनी बस, निमआराम गाडी, विनावातानुकुलित शयनशायन, शिवशाही, शिवनेरी आणि शिवाई बसमध्ये प्रवास करताना दिला जात आहे. मात्र याचा लाभ हा फक्त महाराष्ट्रात प्रवास करण्यासाठी मिळतो. म्हणजेच राज्याबाहेर प्रवास करण्यासाठी 50 टक्के सवलत लागू राहणार नाही.
महिला समृद्धी कर्ज योजना : या योजनेअंतर्गत महिलांना व्यवसायासाठी कर्ज दिले जाते. या अंतर्गत महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पाच लाखापासून ते वीस लाख रुपयांपर्यंत ची मदत दिली जात आहे. यासाठी चार टक्के व्याजदर आकारले जाते. या योजनेमुळे राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहे.
तरुणींना मोफत उच्च शिक्षण मिळणार : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून तरुणींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित केले जात आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून ही योजना राबवली जात असून या अंतर्गत आठ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील तरुणींना उच्च शिक्षण मोफत दिले जात आहे. मात्र याचा लाभ फक्त व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या तरुणींना मिळणार आहे. म्हणजे BA, BCom, BSc अशा अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या तरुणींना याचा लाभ मिळणार नाही.