Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागात तसेच मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस सुरु आहे. शिवाय काही भागात ढगाळ हवामान कायम आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात सध्या अवकाळी पाऊस बरसत आहे.
ऐन दिवाळीत अवकाळी पाऊस बरसला असल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. या अवकाळी पावसाचा शेती पिकांवर देखील विपरीत परिणाम पाहायला मिळाला आहे. खरीप हंगामातील ऐन हार्वेस्टिंग साठी तयार झालेल्या पिकांचे यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
शिवाय रब्बी हंगाम देखील यामुळे मोठ्या प्रमाणात प्रभावित होण्याची शक्यता आहे. तथापि ज्या भागात मान्सून मध्ये चांगला पाऊस झालेला नाही त्या भागांसाठी हा अवकाळी पाऊस फायदेशीर ठरू शकतो असेही मत काही शेतकऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे.
दरम्यान सर्वसामान्य नागरिकांच्या माध्यमातून आता थंडीला केव्हा सुरुवात होणार, अवकाळी पाऊस केव्हा विश्रांती घेणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अशातच आता भारतीय हवामान विभागाने आगामी पाच दिवस महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार अवकाळी पाऊस बरसणार का याबाबत महत्त्वाची माहिती सार्वजनिक केली आहे.
आगामी पाच दिवस कसे राहणार महाराष्ट्रातील हवामान
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता निवळला आहे. याचा परिणाम म्हणून आता अवकाळी पाऊस आणि ढगाला हवामान दूर होणार आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आगामी पाच दिवस महाराष्ट्रातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे. तथापि काही भागात ढगाळ हवामान राहू शकते. अर्थातच आगामी पाच दिवस अंशतः ढगाळ हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मात्र महाराष्ट्रातून आता अवकाळी पाऊस रजा घेणार आहे. रब्बी पेरणीच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. IMD ने सांगितल्याप्रमाणे, आता चक्राकार वाऱ्यांची स्थिती अंदमान समुद्र आणि मध्य व दक्षीण भागात आहे.
याचा परिणाम म्हणून पुढील 24 तासात वायव्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची एक शक्यता तयार होत आहे. मात्र या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात अवकाळी पाऊस बरसणार नाही.
मात्र महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त वारे वाहतील आणि याचा परिणाम म्हणून राज्यात हवामान ढगाळ राहण्याची शक्यता कायम राहणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच पुढील दोन दिवस राज्यातील किमान तापमान दोन ते तीन अंशाने कमी होण्याची शक्यता आहे.
पण दोन ते तीन दिवसानंतर पुन्हा एकदा किमान तापमानात थोडीशी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच राज्यात आता नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यातच थंडीचा जोर वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.