Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील कोकण विभाग वगळता गेल्या 14 ते 15 दिवसांपासून राज्यात पावसाने उसंत घेतली आहे. महाराष्ट्रात कोकण वगळता सर्वत्र प्रामुख्याने कोरडे हवामान पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे कोकणातही मोठा पाऊस पडत नाहीये.
कोकणात केवळ रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात पाऊसच नाहीये. अधून मधून एखाद दोन ठिकाणी पावसाची रीपरीप होत आहे. मात्र महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झाला असला, राज्यातून भर पावसाळ्यात पाऊस गायब झाला असला तरी देखील उत्तर भारतात पावसाचा जोर खूपच वाढला आहे.
उत्तर भारतातील अनेक राज्यात अतिवृष्टी सारखा पाऊस पडत आहे. उत्तर भारतातील उत्तराखंड, आसाम, बिहार, उत्तर प्रदेश, जम्मू कश्मीर या राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होत आहे. विशेष म्हणजे आज उत्तराखंड मधील अनेक भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर संबंधित भागाला अलर्ट जारी करण्यात आला आहे.
उत्तराखंडमध्ये गेल्या 24 तासात 300 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला असून आसाम मध्ये देखील 200 मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, आता उत्तर भारतात सुरू असलेला हा पावसाचा कहर पाहता याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात देखील लवकरच जोरदार पाऊसाला सुरुवात होणार असल्याचा दावा भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून यावेळी करण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर भारतातील पावसाचा प्रभाव म्हणून राज्यातील विदर्भ विभागात आता जोरदार पाऊसाला सुरुवात होणार आहे. विदर्भात 17 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट दरम्यान जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परंतु या कालावधीमध्ये राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आणि अधून-मधून रिमझिम स्वरूपाचा पाऊस बरसणार असा अंदाज आहे.
विदर्भात 17 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट दरम्यान मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एकंदरीत येत्या तीन दिवसात गायब झालेला पाऊस राज्यात पुन्हा एकदा हजेरी लावणार असे सांगितले जात आहे. यामुळे विदर्भ विभागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पण राज्यातील उर्वरित भागातील शेतकऱ्यांना पावसासाठी आणखी काही काळ वाट पहावी लागू शकते असे या हवामान अंदाजावरून स्पष्ट होत आहे.